कराड : हिंदू एकता आंदोलनातर्फे ओगलेवाडी (ता. कराड) येथील धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज चौकातील श्रीराम मंदिराच्या आवारात श्रीराम नवमीनिमित्त भगव्या ध्वजाचे पूजन व ८० फूट उंचीच्या ध्वजस्तंभाचा स्थापना व उद्घाटन सोहळा करवडी (ता. कराड) येथील शिवयोगी विजयलिंग महाराज यांच्याहस्ते उत्साहात साजरा झाला.

जय भवानी, जय शिवाजी, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय श्रीराम या घोषणांनी परिसर दुमदुमला. या सोहळ्यास परिसरातील आठ गावांतील शिवप्रेमी व रामभक्तांची या वेळी मोठी उपस्थिती होती.

‘हिंदू एकता’चे प्रांत उपाध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, ‘हिंदू एकता’चे जिल्हाध्यक्ष व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, चंद्रकांत जिरंगे, राहुल यादव, हिंदुराव पिसाळ, रोहित माने, रमेश शानभाग, सूर्यभान माने, दीपक लिमकर, धनाजी माने, कल्याण डुबल, सचिन लिमकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

विनायक पावसकर म्हणाले, छत्रपती शिवाजीमहाराजांनी हिंदू धर्माची पताका जगभर फडकवली. त्या भगव्या ध्वजाचे व ध्वजस्तंभाचे लोकांनी दररोज पूजन करावे.

विक्रम पावसकर म्हणाले, हिंदू एकता आंदोलनाच्या स्थापनेस ५५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘कराड उत्तर’मधील प्रमुख गावांमध्ये १५५ भगवा ध्वजस्तंभ उभारण्यात येईल. तरुणांनी देश, देव व धर्माचे रक्षण व जतन करावे. विजयलिंग महाराज म्हणाले, प्रत्येक गावागावांमध्ये लोकांनी शिवप्रतिमेचे पूजन करावे व त्यापासून प्रेरणा व स्फूर्ती घ्यावी.