लोकसत्ता प्रतिनिधी
रत्नागिरी शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाकडे भाजप नेते तसेच कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे सत्ताधारी महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला.
भाजप नेते व सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे रामदास कदम यांच्यामध्ये वाद सुरू आहे. यामुळे रत्नागिरीत घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या कार्यक्रमाला भाजप नेत्यांनी व मंत्र्यांनी येणे टाळले असावे अशी चर्चा आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हेदेखील आले नाहीत.
हेही वाचा >>>Bharat Bandh : २१ ऑगस्ट रोजी ‘भारत बंद’ची हाक; जाणून घ्या ‘बंद’मागचं नेमकं कारण?
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. मात्र भाजपचा एकही नेता या ठिकाणी फिरकला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे तसेच चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्यासह बाबाजी जाधव यांसारखे काही मोजकेच नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. या वेळी माजी आमदार रामदास कदम व आमदार योगेश कदम हेही उपस्थित नव्हते. यामुळे महायुतीतील संघर्ष आता वाढत असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना फटका
रत्नागिरीतील या कार्यक्रमासाठी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी बस मागविण्यात आल्याने या तिन्ही जिल्ह्यांतील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. अपुऱ्या बसमुळे ग्रामीण भागातील सेवा या कार्यक्रमासाठी बंद ठेवण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात बसमुळे रत्नागिरीत काही काळ वाहतूक कोंडी झाली. यामुळे प्रवाशांना याचा फटका बसला. याचा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने एसटी प्रशासनाला जाब विचारला.
गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कार्यक्रमाला उपस्थित न राहिलेल्या काही बचत गटांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.