विलासराव देशमुख यांची बरोबरी करणारा नेता निर्माण होऊ शकेल, असे वाटत नाही. अजोड वक्तृत्व, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणारा त्यांच्यासारखा नेता निर्माण होणे नाही. त्यांच्या निधनाला दोन वष्रे होत आहेत, तरीही त्यांची उणीव सातत्याने भासते, असे भावपूर्ण उद्गार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले.
रेणा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने उभारलेल्या विलासराव देशमुख पूर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण व स्मृती संग्रहालयाचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी झाले. अध्यक्षस्थानी पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण, वैशालीताई देशमुख, राज्यमंत्री अमित देशमुख, आमदार दिलीपराव देशमुख, पालकमंत्री सतेज पाटील, डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, विलासरावांनी महाराष्ट्रात विकासाचा डोंगर उभा केला. मराठवाडय़ाला मुख्य प्रवाहात आणण्यास सहकार चळवळ उभारून साखर कारखाने सुरू केले. जिल्हा बँकांमध्ये शिस्त आणली. मोठे सिंचन प्रकल्प आणले. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. विलासरावांकडे मुख्यमंत्रिपद आले, तेव्हा तिजोरीत खडखडाट होता. त्यांनी राज्य भरभराटीस नेले. त्यांच्या कार्याचे भावी पिढीला सतत स्मरण व्हावे, या साठी त्यांचा भव्य पुतळा व स्मृती संग्रहालय प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे चव्हाण म्हणाले.
चाकूरकर यांनी विलासराव धाडसी नेते होते, असे सांगून सामान्यांच्या सुख-दु:खाची जाणीव असल्यामुळेच त्यांच्या प्रत्येक निर्णयात गोरगरिबांचे हित हेच उद्दिष्ट होते. त्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून कृतीची श्रद्धांजली वाहणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी विलासरावांचे अपुरे स्वप्न अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली साकारले जावे, आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, अशा भावना व्यक्त केल्या. निलंगेकर यांनी विलासराव व आपण एकदिलाने काम केल्याचे सांगितले. दिलीपराव देशमुख यांनी विलासरावांचे कार्य प्रचंड मोठे होते. येथील स्मारक प्रतिकात्मक असल्याचे सांगितले. अमित देशमुख यांनी देशमुख कुटुंबीयांसाठी हा भावनिक कार्यक्रम आहे. काका दिलीपराव यांनी सावलीसारखी साहेबांची पाठराखण केली. त्यांच्याच कल्पनेतून हे स्मारक साकारल्याचे सांगितले. लातूरला आयुक्तालय व्हावे, हे विलासरावांचे स्वप्न होते. राज्यातील नेत्यांनी ते साकारण्यास प्रयत्न करण्याची विनंती त्यांनी केली.
कारखान्याचे अध्यक्ष यशवंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. कारखान्याचा आसवनी प्रकल्प कर्जमुक्त करण्यास जिल्हा बँकेला २ कोटी ७९ लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. विद्याधर कांदे पाटील लिखित ‘विलासराव देशमुख – महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन रामानुज रांदड यांनी केले.
सुवर्णाताई देशमुख, गौरवी देशमुख, धीरज देशमुख, बसवराज पाटील, वैजनाथ िशदे, बाबासाहेब पाटील, सतीश चव्हाण, विक्रम काळे, ओमप्रकाश पोखर्णा, जि. प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे व महापौर स्मिता खानापुरे उपस्थित होते.
अन् देशमुख कुटुंबीय गहिवरले
पुतळा अनावरणानंतर वैशालीताई देशमुख यांना अश्रूंचा बांध आवरता आला नाही. संपूर्ण कार्यक्रमात तो सुरूच होता. अमित देशमुख यांनी मी आज गहिवराचे नाही असे ठरवून आलो होतो. मात्र, मला माफ करा, असे म्हणताच त्यांच्यासह दिलीपराव देशमुख यांनाही अश्रू आवरेनासे झाले. संपूर्ण कार्यक्रमच विलासरावांच्या स्मृती जागवणारा ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा