नवीन दुचाकी घेवून घरी परतणाऱ्या दोन तरुण मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू होण्याची दुर्देवी घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या बाबत घडलेली घटना अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील आदित्य संदीप नलगे आणि किरण मोहन लगड हे दुचाकी घेण्यासाठी अहिल्यानगरला गेले होते. मात्र, घरी परत येत असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या पीकअपने जोरदार धडक दिली.

ही दुर्घटना नगर-दौंड महामार्गावरील कोळगाव फाटा येथे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. दौंडकडून नगरच्या दिशेने द्राक्ष घेऊन जाणाऱ्या (एम. एच. १८ बी.जी २९९५) या पीकअपने दुचाकीला धडक दिली. या अपघातात आदित्य नलगेच्या पोटावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या किरण लगड याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचाही दुर्दैवी अंत झाला.

या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून, कोळगाव गावाने दोन तरुण मुलांना गमावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.