मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांनंतर अडचणीत आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आता आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या काटोल येथील घरासोबतच जिल्ह्यातल्या त्यांच्याशी संबंधित ६ ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकले आहेत. सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येनं आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काटोलमधील त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्या घरी, त्यांच्या हॉटेलवर आणि इतर ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकून तपास सुरू केला आहे. याआधी ईडी देखील अनिल देशमुख यांची चौकशी करत असून त्यात आता आयकर विभागाची देखील त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, छापा टाकण्यासाठी आयकर विभागाची पथकं नागपूरमधली नसून बाहेरून आल्याची माहिती मिळत आहे.
Maharashtra | Income-Tax Department is conducting raids at several locations including the Nagpur residence of former state home minister Anil Deshmukh, in connection with income tax irregularities
Visuals from Nagpur pic.twitter.com/ARW6t8fEHh
— ANI (@ANI) September 17, 2021
आयकर विभागाने नागपूरमधील अनिल देशमुखांच्या घरासोबतच नागपूर विमानतळाजवळील त्यांचं हॉटेल, सोयाबीन केकची फॅक्टरी, एनआयटी कॉलेजमध्ये देखील आयटीच्या पथकानं छापेमारी आहे. यासोबतच, त्यांच्या तीन भागीधारांपैकी काद्री आणि भटेवार यांची देखील आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.
ईडीनं अनेकदा बजावले समन्स
याआधी ईडीकडून अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी अनेकदा समन्स बजावण्यात आलेले आहेत. मात्र, अजून देखील अनिल देशमुख चौकशीसाठी हजर न राहिल्यामुळे ईडीनं त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस देखील काढली. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप केले होते. यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. त्यानंतर सीबीआयनं देखील अनिल देशमुख यांच्या घरी आणि इतर संबंधित ठिकाणी छापेमारी केली होती. आता आयकर विभागाकडून देखील त्यांच्या घरासोबत इतर सहा ठिकाणी ही छापेमारी केली आहे.
खासगी सचिवाचं निलंबन!
दरम्यान, गुरुवारी १६ सप्टेंबर रोजी अनिल देशमुख यांचे गृहमंत्री असतानाचे खासगी सचिव आणि अपर जिल्हाधिकारी संजीव पलांडे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात त्यांची चौकशी सुरु असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने त्यांना २६ जूनला अटक केल्यानंतर ६ जुलैपर्यंत ईडीच्या कोठडीत होते. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली. त्यांचा पोलीस कोठडीतील कालावधी ४८ तासांपेक्षा अधिक असल्याने २६ जूनपासून त्यांना निलंबित मानण्यात आलं आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत ते निलंबित राहतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे.