महिनाभरापासून कांदा भावात सुरू असणारी तेजी लक्षात घेऊन प्राप्तिकर विभागाने आपला मोर्चा या क्षेत्रातील व्यापाऱ्यांकडे वळविला आहे. मंगळवारी लासलगाव, सटाणा व उमराणे येथील कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. दिवसभर चाललेल्या या कार्यवाहीत नेमके काय निष्पन्न झाले, त्याची स्पष्टता केली गेली नाही. या प्रकाराने कांदा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
देशभरातील किरकोळ बाजारात कांदा भावाने ८० ते १०० रूपयांची पातळी गाठल्यानंतर खडबडून जाग आलेल्या केंद्र व राज्य सरकारने यामागे साठेबाजी आहे का, याचा शोध घेण्यास सुरूवात केली. कांद्याची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला गेला होता. परिणामी धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी आपल्याकडे शिल्लक असणारा कांदा विक्रीसाठी आणण्याचा सपाटा लावण्यात झाली. यामुळे घाऊक बाजारात भाव काहीसे खाली येऊ लागले. परंतु, किरकोळ बाजारात ते चढेच राहिले. या घडामोडी सुरू असताना मंगळवारी प्राप्तिकर विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी लासलगाव, सटाणा व उमराणे येथील कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकले. लासलगाव येथील ओमप्रकाश रतनलाल राका आणि ब्रम्हेचा फर्म या व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. सकाळी अकरापासून चाललेले हे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. नियमित स्वरूपाची ही तपासणी असल्याचे सांगून फारसे काही बोलण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी नकार दिला. याच पद्धतीने सटाणा व उमराणे येथील काही व्यापाऱ्यांच्या व्यवहारांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, कांद्याच्या किंमती नियंत्रणात राखण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणलेला दबाव बेकायदेशीर असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. जिवनावश्यक वस्तुंवर नियंत्रण आणण्याचा शासनाकडे अधिकार आहे. परंतु, कांद्याचा त्या यादीत समावेश नसताना शासकीय यंत्रणा कारवाईचा बागुलबुवा करत असल्याची तक्रार केली जात आहे.

Story img Loader