राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक यांचे चुलत बंधू व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने बुधवारी छापा टाकला. सकाळी सहा वाजता या विभागाकडून घरातील कागदपत्रे आणि व्यक्तींची चौकशी सुरू आहे. या छाप्याने साताऱ्यातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या कारवाईच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी करत घोषणाबाजी केली.
रामराजे हे सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. तर संजीवराजे आणि रघुनाथराजे यांनी आताच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटात प्रवेश केला होता. परंतु सध्या संजीवराजे हे पुन्हा अजितदादांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
बुधवारी सकाळी सहा वाजता प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. या वेळी रघुनाथ राजे हे निवासस्थानी नव्हते. त्यांना प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्याची माहिती मिळाल्यानंतर ते फलटण येथील निवासस्थानी पोहोचले. त्यांच्याही निवासस्थानी चौकशी सुरू आहे. प्राप्तिकर विभागाने फलटण येथील निवासस्थानाबरोबरच पुणे आणि मुंबई येथील निवासस्थानी देखील अशीच कारवाई केल्याचे समजते. ही कारवाई एकाच वेळी करत चौकशी सुरू केली आहे. दरम्यान अशी कारवाई झाल्याचे समजताच रामराजे गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमा झाली. त्यांनी कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीही सुरू केली. यातून काही काळ फलटण शहरात तणावाचे वातावरण झाले. या वेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.