उद्योजक अभिजीत पाटील यांच्या पंढरपूरसह राज्यातील इतर साखर कारखान्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. सकाळी साडेसहापासून या कारखान्यांची झाडाझडती सुरू आहे. अभिजीत पाटलांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचं पाठबळ असल्याची चर्चा होती. या बड्या नेत्याला या कारवाईतून लक्ष्य केलं जात असल्याचंही बोललं जातंय.
उस्मानाबादमध्ये धाराशिव साखर कारखान्यावर आयकर विभागाची धाड
चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. पहाटेपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई सुरू आहे. अभिजीत पाटील चेअरमन असलेल्या कारखान्यावर धाडी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. अभिजीत पाटील हे पंढरपूर येथील असून ते साखर सम्राट म्हणून गेल्या १० वर्षात ओळखले जात आहेत.
अभिजीत पाटलांकडे सध्या कोणते साखर कारखाने?
१. धाराशीव साखर कारखाना, चोरखडी (उस्मानाबाद)
२. धाराशीव साखर कारखाना युनिट २ (लोहा, नांदेड)
३. वसंतदादा साखर कारखाना विठेवाडी, चांदवड, नाशिक
४. सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना (पंढरपूर, सोलापूर)
याशिवाय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक एकहाती जिंकल्याने हाही कारखाना त्यांच्या ताब्यात आहे.
पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भालके गटाला धक्का देत २१ पैकी २० जागा जिंकल्यानंतर ते प्रकाशझोतात आले होते. ते विठ्ठल सहकारी व धाराशिव कारखाना चेअरमन आहेत. त्यांच्या ताब्यात ५ कारखाने आहेत. त्यात विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सांगोला सहकारी साखर कारखाना, नाशिक व नांदेड येथे एक, धाराशिव असे साखर कारखाने आहेत.
हेही वाचा : “…एवढीच माफक अपेक्षा”, अनिल परबांच्या घरावरील ईडीच्या धाडीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया!
वाळू माफिया ते साखर सम्राट असा अभिजीत पाटील यांचा प्रवास आहे. त्यांना तत्कालीन सोलापूर जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कारवाईनंतर वाळू तस्करी प्रकरणात जवळपास ३ महिने तुरुंगवासही झाला होता. त्यानंतर त्यांनी बाहेर आल्यावर ट्रॅक बदलला आणि साखर कारखानदारी सुरू केली.