मराठवाडय़ात तीव्र दुष्काळ असला, तरी त्याचा अजून बाजारपेठेवर फारसा परिणाम झालेला नाही. फेब्रुवारीअखेपर्यंत औरंगाबाद शहरातून २ हजार १३९ कोटींची विक्रीकर वसुली झाली. अजूनही कर भरला नाही, अशा ९५० उद्योगांना नव्याने नोटिसा बजावल्या आहेत. लातूर, परभणी व नांदेड जिल्हय़ांमधूनही ३२८ कोटी ७३ लाख विक्रीकरापोटी सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत. दुष्काळात विक्रीकराची आकडेवारी विरोधाभासी दिसत असली, तरी येत्या दोन महिन्यांत करवसुलीवर दुष्काळाचे परिणाम दिसू शकतील. मात्र, या वर्षांत धुळे व नाशिक विभागांच्या तुलनेत विक्रीकर वसुलीत औरंगाबाद विभागाने आघाडी घेतली आहे.
मराठवाडय़ातली दुष्काळी स्थिती व जागतिक मंदीचे परिणाम जाणवतील अशी चर्चा सहा महिन्यांपासून आहे. फेब्रुवारीअखेपर्यंत विक्रीवर त्याचा परिणाम फारसा दिसून आला नाही. वेगवेगळय़ा वस्तूंवरील ग्राहकांकडून वसूल व्हॅटची रक्कम सरकारी तिजोरीत यावी, यासाठी विक्रीकर सहआयुक्त निरुपमा डांगे यांनी विशेष अभियान सुरू केले. विशेषत: औरंगाबाद शहरात नव्याने जी दुकाने सुरू करण्यात आली, त्याचे सर्वेक्षण अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले.
विक्रीकर भरणाऱ्यांची चार श्रेणींत विभागणी केली जाते. एक कोटीपेक्षा अधिक कर भरणारे, १० लाख ते १ कोटीपर्यंतचे करदाते, १ कोटी ते १० कोटींपर्यंतचे करदाते व त्यापेक्षा कमी कर भरणाऱ्या व्यावसायिकांचा यात समावेश आहे. औरंगाबाद शहरात सुमारे १९ हजार २९३ करदाते आहेत. राज्याच्या तिजोरीत औरंगाबाद शहरातून मोठा हिस्सा विक्रीकराच्या रूपाने जातो. या वर्षी बाजारपेठेवर काहीअंशी परिणाम असले, तरी विक्रीकर सहआयुक्तांनी करवसुलीसाठी विशेष अभियान हाती घेतले. ज्या व्यावसायिकांची नोंदणी झाली नाही, त्यांची नोंदणी करण्यात आली. कर भरण्यास हयगय करणाऱ्या व्यावसायिकांची बँक गॅरंटी जप्त करण्यात आली. तसेच कर बुडविण्यासाठी कागदोपत्री घोळ घालणाऱ्या काही कंपन्यांवर छापे टाकण्यात आले.
औरंगाबाद औद्योगिक वसाहतीत सुमारे १२५पेक्षा अधिक व्यावसायिक विक्रीकर विभागाच्या ‘अ’ श्रेणीत मोडतात, जे दरवर्षी एक कोटीपेक्षा अधिक विक्रीकर भरतात. या वर्षी विक्रीकरासमवेत व्यवसाय करवसुलीसाठीही विशेष प्रयत्न करण्यात आले. वर्षांनुवर्षे व्यवसाय करणाऱ्या वकील, डॉक्टर मंडळींकडूनही प्रत्येकी २ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले. जानेवारीअखेर यातून ५७ कोटी सरकारच्या तिजोरीत जमा झाले.
या अनुषंगाने ‘लोकसत्ता’शी बोलताना विक्रीकर सहआयुक्त निरुपमा डांगे म्हणाल्या, की बाजारपेठेवर दुष्काळ व मंदीचा परिणाम यापुढे दिसू शकेल. मात्र, विक्रीकराची आजची आकडेवारी निश्चितच आशादायी आहे.
औरंगाबाद शहरात २१ अब्जांपेक्षा अधिक विक्रीकराची वसुली!
मराठवाडय़ात तीव्र दुष्काळ असला, तरी त्याचा अजून बाजारपेठेवर फारसा परिणाम झालेला नाही. फेब्रुवारीअखेपर्यंत औरंगाबाद शहरातून २ हजार १३९ कोटींची विक्रीकर वसुली झाली. अजूनही कर भरला नाही, अशा ९५० उद्योगांना नव्याने नोटिसा बजावल्या आहेत. लातूर, परभणी व नांदेड जिल्हय़ांमधूनही ३२८ कोटी ७३ लाख विक्रीकरापोटी सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत.
First published on: 15-03-2013 at 02:51 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Income tax department recover 2 thousand crore as a tax from aurangabad city