विविध राज्यांतील महिला आयोगांचे अधिकार वाढविण्याची सूचना भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केंद्र सरकारला केली आहे. काही राज्यांमध्ये जलदगती न्यायालयाची गरज आणि महिला पोलीस ठाण्यांची निर्मिती करावी, अशीही सूचना केल्याचे त्यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत सांगितले.
दि. १७ ते २४ जूनदरम्यान दिल्ली ते कोलकाता अशी नारी सन्मान यात्रा काढण्यात आली. या यात्रेदरम्यान आढळून आलेल्या उणिवांविषयीची माहिती केंद्र सरकारला देण्यात आली. दहा राज्यांमध्ये केंद्र सरकारने नव्याने केलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी या यात्रेचे आयोजन केले होते. यात्रेला पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक पाठिंबा मिळाल्याचा दावा रहाटकर यांनी केला. शौचालयांच्या योजनेसाठी विशेषत: महिलावर्ग आग्रही आहे. शौचालय हवे असल्यास गावाच्या प्रमुखांकडे मागणी नोंदविली जाते. मात्र, त्याहीपेक्षा सोपी पद्धत विकसित करता येऊ शकते का, यावर चर्चा सुरू असून एखादा अर्ज ऑनलाईन उपलब्ध करून दिल्यास महिलांना तशी नोंद करणे सोपे होईल. तशी सूचना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
महिला आयोगाचे अधिकार वाढविल्यास तक्रारीची दखल घेऊन परिणामकारकता वाढवता येऊ शकेल, असेही केंद्र सरकारला कळविल्याचे त्या म्हणाल्या.

Story img Loader