लोकसत्ता वार्ताहर
नांदेड : भाजपाचे नवनेते खा.अशोक चव्हाण यांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेतील भाजपाच्या आणि काँग्रेस व अन्य पक्षांतून भाजपात आलेल्या माजी नगरसेवकांची औपचारिक बैठक येथे घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लांब असली, तरी आपापल्या प्रभागांत संपर्क वाढवा, नागरिकांसोबत बैठका घ्या, असा कानमंत्र चव्हाण यांनी उपस्थितांना दिला.
खा.चव्हाण मागील तीन दिवसांपासून नांदेड मुक्कामी आहेत. यादरम्यान वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी रविवारी सायंकाळी माजी नगरसेवकांना एकत्र आणून शहरातील तसेच पक्षातील हालहवाल जाणून घेतले. वरील बैठक भाजपाचे महानगर कार्याध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या पुढाकारातून चंद्रलोक हॉटेलच्या सभागृहात पार पडली. माध्यम प्रतिनिधींना या बैठकीची कुणकुण लागणार नाही, याची खबरदारी आयोजकाने घेतली होती.
नांदेड मनपामध्ये स्थापनेनंतर प्रथमच गेली अडीच वर्षे प्रशासकीय राजवट आहे. १९९८ ते २०२२ या २४ वर्षांत चव्हाण यांनी काँग्रेसच्या माध्यमातून मनपामध्ये आपले वर्चस्व राखले होते. पुढील काही महिन्यांत मनपाची निवडणूक लागल्यानंतर या संस्थेवर भाजपाचा झेंडा फडकविण्याचे चव्हाण यांचे ध्येय असून मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी निवडणूक तयारीचा आरंभ केला, असे मानले जात आहे.
राज्यातील महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी नांदेड जिल्ह्यामध्ये पक्षविस्ताराची गुढी उभारल्याचे मागील काही दिवसांमध्ये दिसले. ‘राष्ट्रवादी’च्या धडाकेबाज कार्यक्रमांतून चव्हाण यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले गेले, तरी महायुतीत थोरलेपण मिरवणार्या भाजपामध्ये स्थानिक पातळीवर शांतता जाणवत होती, या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी माजी नगरसेवकांना एकत्र आणून शहरी भागात पक्षाचे काम वाढवा तसेच पक्षाच्या संघटनपर्वातील सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करा, असा संदेश सर्वांना दिला.
पक्षाच्या मागील एका कार्यक्रमात चव्हाण यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यास अनुकूलता दर्शविली होती. त्यांच्या त्या वक्तव्याचे पडसाद मित्रपक्षांमध्ये उमटले होते. रविवारच्या वरील बैठकीत मात्र चव्हाण यांनी स्वबळासंदर्भात कोणतेही वक्तव्य केले नाही, असे एका माजी नगरसेवकाने सोमवारी सांगितले. वरील बैठकीत अरविंद भारतीया, चैतन्यबापू देशमुख, अॅड.महेश कनकदंडे, महेश खोमणे, शैलजा स्वामी, मिलिंद देशमुख आदिंनी मनोगत व्यक्त केले.
फडणवीसांची लवकरच नांदेडमध्ये सभा
महायुती सरकारमधील एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री आपापल्या पक्षांच्या कार्यक्रमांनिमित्त नांदेडमध्ये मोठ्या जाहीर सभा घेऊन गेले. या दरम्यान भाजपाने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षाची एक व्यापक बैठक झाली; पण येणार्या काळात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना नांदेडमध्ये आमंत्रित करून भाजपातर्फे मोठी सभा आयोजित करण्याचा मनोदय खा.चव्हाण यांनी वरील बैठकीमध्ये व्यक्त केला. मित्रपक्षांतून झालेल्या टिकाटिप्पणीवर त्यांनी वरील बैठकीत कोणतेही भाष्य केले नाही, असे सांगण्यात आले.