सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या दारूण पराभवानंतर जिल्ह्य़ातील काँग्रेस पक्षाची अवस्था केविलवाणी झाली असून पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर नवा जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी घेण्यास कोणीही पुढे येत नसल्याचे बोलले जाते. तर इकडे राज्यपालांच्या कोटय़ातील विधान परिषदेतील रिक्त जागेवर दुसऱ्यांचीच वर्णी लागल्याने निष्ठावंतांना वाली नसल्याची भावना वाढीला लागली आहे. त्याचवेळी पक्षात बेशिस्त वाढत असल्याचेही चित्र दिसू लागले आहे.
शिंदे यांचा लोकसभा निवडणुकीत मानहानिकारक पराभव झाल्यानंतर पक्षाचे शहराध्यक्ष धर्मा भोसले व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके या दोघांनी पदाचे राजीनामे प्रदेशपक्षश्रेष्ठीकडे दिले असून यात भोसले यांच्या ठिकाणी माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांची वर्णी लावण्यात आली आहे. तर जिल्हाध्यक्ष शेळके यांच्या वारसदाराचा शोध अद्यापि लागला नाही. जिल्हाध्यक्षपदासाठी पंढरपूरच्या वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, प्रकाश पाटील (तुंगत, पंढरपूर) आदींची नावे चर्चेत आहेत. परंतु यापैकी कोणाचीही जिल्हाध्यक्ष होण्याची तयारी नसल्याचे काँग्रेस भवनाच्या वर्तुळातून सांगितले जाते. सिध्दाराम म्हेत्रे यांना जिल्हाध्यक्षपद दिले गेले तर आगामी विधानसभा निवडणुकीत अक्कलकोटमधून उभे राहण्याची संधी हुकण्याची त्यांना भीती वाटत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे नवा जिल्हाध्यक्ष निवडण्याचा निर्णय प्रलंबित राहिला आहे.
या पाश्र्वभूमीवर राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागेवर वर्णी लागण्यासाठी स्थानिक ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे, प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा व इतर मंडळीनी पाठरपुरावा केला होता. यात सुशीलकुमार शिंदे यांची भूमिका निर्णायक समजली जात असताना अखेर निष्ठावंताना डावलले गेले आणि माळशिरसचे अॅड. रामहरी रूपनवर यांना संधी देण्यात आली. अॅड. रुपनवर हे पूर्वी भाजपमध्ये होते. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सुशीलकुमार शिंदे यांच्यावर निष्ठा ठेवून काम करणाऱ्या मंडळींवर उपेक्षित राहण्याची वेळ आल्याने त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. त्याचा राग आगामी विधानसभा निवडणुकीत उटण्याची शक्यता असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. त्याचे प्रत्यंतर आतापासूनच येऊ लागले असून विशेषत: शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात मोर्चेबांधणी केली जात आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे पुन्हा दुसऱ्यांदा उभे राहण्याची तयारी करीत असताना त्यांच्या परस्पर माजी महापौर नलिनी चंदेले यांनी या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. मागील २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप करीत नलिनी चंदेले यांनी आतापासून आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गावर काटे पेरण्याचा प्रयत्न चालविला आहे. तर शिंदे यांच्यापासून दुरावलेले विष्णुपंत कोठे यांचे पुत्र महेश कोठे यांनीही शहर मध्य मतदारसंघातून उभे राहण्याची इच्छा व्यक्त केल्याने हा काँग्रेसअंतर्गत राजकीयदृष्टय़ा चर्चेचा विषय झाला आहे.
सोलापुरात काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढू लागली
सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या दारूण पराभवानंतर जिल्ह्य़ातील काँग्रेस पक्षाची अवस्था केविलवाणी झाली असून पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर नवा जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी घेण्यास कोणीही पुढे येत नसल्याचे बोलले जाते.
First published on: 08-06-2014 at 02:35 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase disturbance in solapur congress