सावंतवाडी : संपूर्ण महाराष्ट्रात वनआच्छादनात मोठ्याप्रमाणात घट होत असतना मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनआच्छादनात २९.३७ चौ.मीटरने मागील दहा वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रातील वन आच्छादनात १ हजार, ८०५.७५ चौ. किमीने घट झाल्याचे केंद्रीय पर्यावरण विभागांच्या भारतीय वन सर्वेक्षण अहवालातून स्पष्ट झाले आहे. हा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्याची आकडेवारी यातून पुढे आली आहे.
या अहवालात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागील दहा वर्षांतील वनआच्छादन हे १.२८१.९३ चौ.किमी होते तर सध्या हे वनआच्छादन १.३११.३० चौ.किमी एवढे आहे. यात तब्बल २९ चौ.किमी ची वाढ झाली आहे. तर पश्चिम घाटातील घनदाट वनआच्छादनामध्ये गेल्या दहा वर्षांत वाढ झाली असली तरी, मध्यम आणि खुल्या स्वरुपाच्या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने एकूणच वनक्षेत्रामध्ये ५८.२२ चौ. किमीने घट झाल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते ‘भारतीय वन सर्वेक्षण अहवाल २०२३’चे प्रकाशन २१ डिसेंबर प्रसिद्ध करण्यात आला. दर दोन वर्षांनी देशातील वनांची स्थिती सांगणारा हा अहवाल ‘भारतीय वन सर्वेक्षण विभागा’च्या माध्यमातून प्रकाशित करण्यात येतो. या अहवालामधून पश्चिम घाटातील वनक्षेत्राबाबत गंभीर बाबी समोर आल्या आहेत. पश्चिम घाट हा १ लाख, ४० हजार चौ. किमी भौगोलिक क्षेत्रावर विस्तारलेला आहे. त्याचा विस्तार गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या सहा राज्यांमध्ये आहे. २०१२ साली पश्चिम घाटाला ‘युनेस्को’ चा जागतिक वारसास्थळाचा दर्जा देखील मिळाला आहे. असे असले तरी सह्याद्री च्या वनआच्छादनात दिवसेंदिवस होणारी घट ही चिंतेची बाब आहे. मात्र दुसरीकडे सह्याद्रीच्या पट्ट्यात येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनआच्छादनात मागील दहा वर्षांत मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात वृक्षतोडीला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे बेसुमार होणारी वृक्षतोड टळली असून दोडामार्ग तसेच सावंतवाडी तालुक्यात इतर तालुक्याच्या तुलनेत मोठी वनसंपदा आहे. ही वनसंपदा राखण्यात वनविभागाला यश आले आहे. त्याचाही परिणाम वनआच्छादन वाढण्यात मदत झाली आहे. वन आच्छादनात झालेली वाढ ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भूषणावह असल्याचे मानले जात आहे.
सिंधुदुर्ग वनाच्छादीत
प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड टळली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील दहा वर्षांत एकही मोठा नवा प्रकल्प आला नाही. यामुळे ही होणारी वृक्षतोड टळली असून वृक्ष लागवडीची मोहीम यशस्वी करण्यात सिंधुदुर्ग वनविभाग आघाडीवर होता हे ही कारण वनआच्छादन विस्तारण्यात मोलाचे ठरले आहे. आंबोली घाट जैवविविधतेचा संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो.
पर्यावरण व पर्यटन अभ्यासक हेमंत ओगले म्हणाले, सिंधुदुर्गातील वाढलेली वनसंपदा ही इथल्या जैवविविधतेसाठी खूप आशादायक चित्र आहे. त्याच्या संवर्धनासाठी यापुढे अधिक प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. यातून पर्यटनासाठी भविष्यात अनेक संधी उपलब्ध होतील. जैवविविधतेचे संवर्धन होईल अशी अपेक्षा आहे.