लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : देशाला आणि राज्याला ज्या जिल्ह्याने, ज्या तालुक्याने पुरोगामित्वाचा विचार दिला, त्याच जिल्ह्यात प्रतिगामी शक्तीमध्ये वाढ होत आहे, ही खंत आहे. ज्यांनी पक्षासोबत, विचारांसोबत गद्दारी केली, त्यांना कार्यकर्ता शेकाप माफ करणार नाही. कुणाच्याही जाण्याने ही पुरोगामी चळवळ थांबणार नाही असे मत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी बुधवारी व्यक्त केले. पक्षातील फुटीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा वेश्वी येथील घरी मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन केले.

शेतकरी, कष्टकरी, कामगारांसाठी ज्या स्व. नारायण नागू पाटील, स्व. प्रभाकर पाटील, स्व. दत्ता पाटील, स्व. मीनाक्षी पाटील यांनी संपूर्ण राज्यात पुरोगामी विचार रुजविला. ज्यांनी शेतकऱ्यांना जमिनी मिळवून दिल्या. जिल्ह्यात शिक्षणाचे द्वार खुले केले, त्यांच्याच विचारांशी प्रतारणा करुन, पुरोगामी विचार पायदळी तुडवून जे प्रतिगामी विचारांसोबत जात असतील, आपले विचारच विकत असतील, त्यांना जागा दाखविल्याशिवाय शेकापचा निष्ठावंत कार्यकर्ता गप्प बसणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकरी कामगार पक्षाने कायमच गोरगरीबांशी बांधीलकी जपली आहे. नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील तसेच ॲड. दत्ता पाटील यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे काम पाटील कुटुंबियांसह शेकापच्या कार्यकर्त्यांनी केले. जे आज सोडून गेले आहेत, त्यांना पक्षाने अनेक पदे दिली. वेगळे अधिकार दिले. परंतु, नाना पाटील, प्रभाकर पाटील व ॲड. दत्ता पाटील यांचा विचार संपविण्याचे काम गद्दारांनी केले असा घणाघात त्यांनी यावेळी व्यक्त केला. पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये एक वेगळ्या पद्धतीने स्थान दिले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत कोणी मते फोडली, कोणी गद्दारी केली, हे उघड झाले आहे.

आगामी काळात शेकापचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणून त्यांना जागा दाखविली जाणार आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, आदी मान्यवरांसह अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्यातील शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.