अशोक तुपे
आंबेमोहराप्रमाणेच सुगंधित, चवीला गोड, खाण्यास मऊ , पण थोडा चिकट असलेल्या इंद्रायणी तांदळाची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत राज्यभर वाढू लागली असून पुणेकरांच्या पसंतीला उतरलेल्या या मावळातील तांदळाने आता मुंबईकराच्या थाळीतही स्थान मिळविले आहे. अवघ्या तीस वर्षांपूर्वी विकसित करण्यात आलेल्या इंद्रायणी तांदळाच्या गुणांमुळे त्याला मुख्य आहारात वाढत चाललेली मागणी लक्षणीय आहे.
आंबेमोहोर हा तांदळाचा देशी वाण. त्याच्या सुगंधाबरोबरच गोड चवीमुळे तो बासमतीप्रमाणेच शेकडो वर्षे खवय्यांच्या पसंतीला उतरलेला होता. पेशवाईच्या काळात तर आंबेमोहोर तांदळाच्या पंगती उठत. सेंद्रिय पद्धतीने पिकविल्या जाणाऱ्या या तांदळाचे उत्पादन पाऊस अधिक झाल्यास कमी होते. त्यावर करपा रोगही होतो. या अडचणींना सोडविण्यासाठी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वडगाव मावळ येथील संशोधन केंद्रात आंबेमोहोर व १५७ आयआर ८ या दोन तांदळाच्या जातींचा संकर करण्यात आला. त्यातून १९८७ साली इंद्रायणी ही जात विकसित करण्यात आली. मावळ, वेल्हा, भोर, मुळशी, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर, वाई, जावळी, पाटण, कराड, नगर जिल्ह्य़ांतील अकोले, नाशिकच्या धुळे, नंदुरबार या भागांत त्याचे उत्पादन सुरू झाले. त्यानंतर शेतकरी आंबेमोहोरऐवजी या तांदळाकडे वळले. आता सह्य़ाद्रीच्या कडेला असलेल्या सखल भागात कोल्हापूरपासून ते घोटीपर्यंत त्याची लागवड सुरू झाली. त्याची लागवड ही विदर्भातही सुरू झाली आहे. मात्र पुणे जिल्ह्य़ातील मावळातील जमिनीतील गुणधर्म, हवामान, पाणी त्याला खूप मानवते. त्यामुळे अन्यत्र लागवड झालेल्या तांदळापेक्षा तो चवीला व सुगंधाला खूपच चांगला असतो.
आता इंद्रायणी तांदळातही भेसळ सुरू झाली आहे. काही लोक हे अन्य भागात पिकविलेला तांदूळ इंद्रायणी नावाने बाजारात आणतात. त्याला सुगंध यावा म्हणून काही रासायनिक पूड वापरली जाते. विशेष म्हणजे काही सुगंधी द्रव्यांना अन्न व औषध प्रशासनाची मान्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र हा तांदूळ धुतला की त्याचा सुगंध जातो. ग्राहकांनी या फसवणुकीपासून सावध राहण्याची गरज आहे.
चिकट का?
बासमती तांदूळ हा मोकळा असतो. तो बिर्याणीसाठी लोकांना आवडतो; पण आमटीभात, पिठलंभात, दाळभात, भाताचे मेतकूट, दाळ खिचडी याकरिता मात्र त्याची गोडी अधिक असते. त्यामुळे त्याला अधिक मागणी आहे. तांदळामध्ये अमायलुज हा घटक २० टक्क्यांपेक्षा कमी असला की तो मऊ, चिकट होतो. इंद्रायणीमध्ये अमायलुज हा घटक १८ ते १९ टक्के आहे. त्यामुळे तो चिकट होतो. आता राष्ट्रीय स्तरावर तांदूळ संशोधनाची मानके निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये अमायलुज हा घटक २० ते २५ टक्के असेल तरच कृषी अनुसंधान परिषद भाताची जात प्रसारित करायला संशोधन संस्थांना मान्यता देते. मात्र इंद्रायणी हा मानकांची निश्चिती करण्यापूर्वी प्रसारित झाला. त्यामुळे त्याला मान्यता मिळाली.
भौगोलिक मानांकन आवश्यक..
त्याला तांदळाच्या गिरणीमध्ये दोन-तीन वेळा पॉलिश करतात. त्यामुळे तो पांढराशुभ्र असा दिसतो. इंद्रायणीचा सुगंध हा टूएपी या घटकांमुळे येतो. मात्र सुवासाकरिता अनुकूल हवामानही लागते. तांदळाचे पीक फुलोऱ्यात असताना आद्र्रता ही ६९ ते ७४ टक्के लागते तरच त्याला सुगंध येतो. डोंगरदऱ्याच्या कडाकाठाला त्याचा सुगंध व चव आणखी वाढते. आता जरी अन्यत्र घेतला जात असला तरी त्याला पूर्वीसारखी गोडी मात्र काही आलेली नाही. इंद्रायणी हा खवय्यांच्या पसंतीला उतरला. त्यामागे मावळातील जमिनीचे गुणधर्मही कारणीभूत आहेत. मात्र हा संकरित तांदूळ असल्याने त्याला भौगोलिक मानांकन मिळत नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ गणेश हिंगमिरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
आणखी एक वाण..
वडगावमावळ येथीलच संशोधन केंद्रात इंद्रायणी व सोनसळी या दोन तांदळांच्या प्रजातीचा संकर करून फुले समृद्धी ही जात विकसित करण्यात आली. हा भात इंद्रायणीपेक्षा कमी चिकट आहे. सुगंधही इंद्रायणीसारखाच आहे. त्याची पाने रुंद आहेत. इंद्रायणीपेक्षा कमी दिवसांत तो तयार होतो. मात्र आता फुले समृद्धी ही जातच इंद्रायणी म्हणून सर्वत्र ओळखली जाते. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने २००७ साली कुठलाही वाण प्रसारित केला तर त्यामागे फुले हे नाव लावण्याचा निर्णय घेतला; पण इंद्रायणी त्यापूर्वी प्रसारित झालेला होता. त्यामुळे त्याच्यामागे फुले हे नाव लागले नाही. मात्र नंतर फुले समृद्धी, फुले सुगंधा, फुले मावळ हे तांदळाचे नवीन वाण आले. फुले समृद्धी हा वाण इंद्रायणी या नावानेच बाजारात विकला जातो.
आंबेमोहोरचे पिल्लू..
राज्यातील आंबेमोहोर व आजराघनसाळ या दोन तांदळाला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. दोन्ही तांदूळ हे बिगरबासमती असून त्यांना जगभर मागणी आहे. मात्र त्याची लागवड थांबली असून फार मोजकेच शेतकरी लागवड करतात. बाजारात आता आंबेमोहोर तांदूळ फारच अल्प प्रमाणात उपलब्ध आहे. दुधाची तहान ताकावर भागविणे असा प्रकार झाल्याने खवय्ये हे इंद्रायणीकडे वळले. आंबेमोहोरचे सारे गुणधर्म इंद्रायणी तांदळात आले आहेत. त्याला आंबेमोहोरचे पिल्लू असेही गमतीने म्हटले जाते.
नामकरण कसे?
खवय्यांना एकाच प्रकारचा तांदूळ चालत नाही. त्यामुळे बासमतीप्रमाणेच अन्य तांदूळही त्यांच्या जिव्हा तृप्त करतात. त्यामुळेच इंद्रायणीने आपले स्थान बाजारात बळकट केले आहे. पुणे जिल्हय़ातून इंद्रायणी नदी वाहते. वारकरी संप्रदायात तिला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे वडगावमावळला हा संकरित वाण प्रसारित केला. तेव्हा त्याला म्इंद्रायणीचे नाव देण्यात आले.
वैशिष्टय़े काय?
* आंबेमोहोरसारखाच सुगंधी, गोड, खाण्यास मऊ, मात्र काहीसा बुटका, उष्ण हवामानालाही काही प्रमाणात अनुकूल, जिवाणूजन्य व करपा रोगास प्रतिकारक असलेल्या या वाणाचे उत्पन्न चांगले येते.
* इंद्रायणी हा पचायला खूपच चांगला तांदूळ आहे. तो मऊ असल्याने लहान मुले व वृद्धांना चावायला त्रास होत नाही.
* तुपट असल्याने तूप नसले तरी डाळभात चांगला लागतो. गावरान तुपाने तर त्याची चव आणखीच वाढते. पण हा तांदूळ थंड झाला की कडक होतो. त्यामुळे तो गरमच खावा लागतो.
औषधी गुण.. : इंद्रायणी हा पौष्टिक आहे. पूर्वी गरोदर महिला व मुलांना तांदळाची पेज दिली जात असे. त्या वेळी आंबेमोहोर व नंतर इंद्रायणीची पेज केली जात असे. इंद्रायणीत लोह, जस्त चांगले आहे. इंद्रायणीत ‘अॅण्टिऑक्सिडंट’ घटक आहे. सी जीवनसत्त्व अधिक आहे. नायट्रोजन पातळी ही ३० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या तांदळापासून कर्करोगाचा धोका नाही. गोड असल्याने मात्र त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा थोडासा जास्त आहे. मधुमेह असलेल्यांना त्याचा वापर थोडा जपून करावा लागतो.