राज्यातील मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. आता राज्य सरकारी सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत दोन वर्षांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच निवृत्तीचं वय ६० वरून ६२ करण्यात आलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. तसेच राज्यातील डॉक्टरांच्या रिक्त जागा लवकरच भरल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
“राज्यात आता आरोग्य अधिकाऱ्यांचं निवृत्तीचं वय ६२ वर्षे असणार आहे. यामुळे एका वर्षांनंतर निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना निवृत्तीचं वय ६२ वर्षे असणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर एका वर्षाचा कालावधी वाढवण्यात आला आहे”, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. “डॉक्टर्सची रिक्त पदही लवकरच भरली जाणार आहेत. गेल्या आठ दिवसात पहिल्या टप्प्यात ८९९ जागा भरल्या आहेत. पुढील तीन ते चार दिवसात उर्वरित भरतीची जाहिरात काढली जाणार आहे. यामध्ये पुन्हा मेडिकल ऑफिसर्सची भरती केली जाणार आहे. त्यामुळे सर्व रिक्त जागा भरण्याचं काम आरोग्य मंत्रालयाकडून सुरु आहे”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
केजरीवाल यांचा गोव्यासाठी ‘पॉवर’फूल प्लान! ‘या’ घोषणेमुळे सत्ताधारी आणि विरोधकांना फुटला घाम
देशात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र असं असताना तिसऱ्या लाटेचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशननं दिला आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णवाढीचा दर कमी आहे. असं असलं तरी करोनाचा धोका पाहता राज्यात करोना रोखण्यासाठीच्या नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. यामुळे व्यापारी आणि प्रवाशांच्या पदरी निराशा पडली आहे. दुकानं आणि प्रवासाच्या नियमात कोणतेही बदल नसतील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्यावर आमचा भर असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. उर्वरित २६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नगरमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे.