सांगली: तब्बल दीड महिन्याच्या विलंबानंतर सुरू झालेल्या पावसाने जिल्ह्यात मुक्काम ठोकला असून मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव आणि जत तालुययाला वरदान ठरणार्‍या चांदोली धरणातील पाणीसाठा बुधवारी ५० टक्के झाला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाउस पडत असल्याने शिराळा तालुक्यातील मोरणा, वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत असून सांगलीजवळील कृष्णा नदीतील पाणी वाढत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेले दोन दिवस जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा तर पश्‍चिम भागातील शिराळा तालुक्यात मुसळधार पाउस पडत आहे. पावसामुळे अख्खा जिल्हा ओलाचिंब झाला असून रात्रभर पावसाची हजेरी होती. मुरवणीचा पाउस होत असल्याने याचा फायदा विहीरीबरोबरच आटलेल्या विंधन विहीरींना होणार आहे. ओढ्या नाल्यांना अद्याप पाणी आले नसले तरी रानात पाणी साचू लागले असल्याने शेतकरी सुखावला आहे.

आणखी वाचा-साताऱ्यासह महाबळेश्वर वाईमध्ये जोरदार पाऊस; अंबेनळी घाटात दरड कोसळली

दुष्काळी भागाला वरदान ठरणार्‍या चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाउस पडत असून गेल्या २४ तासात धरणाच्या ठिकाणी ६७ मिलीमीटर पाउस झाला असल्याचे जलसंपदा विभागातून सांगण्यात आले. वारणा नदीवरील चिंचोली व माणगांव हे दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वारणानदी दुथडी भरून वाहत असून झपाट्याने पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. चांदोली धरणाची पाणी पातळी ६०६.३० मीटर झाली असून धरणातील पाणीसाठा १७.११ टीएमसी (क्षमता ३४.४०) झाला आहे. २४ तासात धरणामध्ये १.१६ टीएमसी पाणी वाढले आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १४.९ मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक ३६.३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय झालेला पाउस मिली मीटरमध्ये पुढीलप्रमाणे. मिरज १५.२, जत १४.२, खानापूर-विटा १०.४, वाळवा-इस्लामपूर ११.६, तासगाव १६, आटपाडी १०.२, कवठेमहांकाळ १७, पलूस ९.६ आणि कडेगाव ५.७.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in water level of warana river and chandoli dam at half mrj