रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाढत्या उष्णतेचा फटका शेतकरी आणि काजू – आंबा बागायतीला मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. उष्णतेमुळे आंबा व काजू बागायती असलेल्या भागात व डोंगरदऱ्यात वणवा लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने अशा बागायतींचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे.  या वणव्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदार हवालदिल झाला आहे.

कोकणातील रत्नागिरी  जिल्ह्यामध्ये अन्नधान्य पिकांसह काजू व आंबा या फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. जिल्ह्यामध्ये आंबा व काजूची लागवड करणारे शेतकरी या बागायतीवर आपले  आर्थिक उत्पन्न घेत असतात. जिल्ह्यात वर्षानुवर्ष वणवा लागण्याचे प्रमाण अल्प असताना, या वर्षी वाढत्या उष्णतेमुळे हे प्रमाण चांगलेच वाढल्याचे दिसून येते आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये एका दंत महाविद्यालयाच्या शेजारी वनवा लागून आंबा बागायतीचे नुकसान झाले. मात्र मोठी हानी  होण्याआधीच अग्निशामक दलाच्या बंबाने आग आटोक्यात आणली. याबरोबर चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटात मोठा वणवा लागून तेथील आंबा बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच आलोरे येथे वणवा लागून दोन लहान घरे आणि आग विझवण्यास गेलेल्या तरुणाच्या दुचाकीचे  जळून नुकसान झाले.  तेथे असलेल्या आंबा बागायतीला या आगीची झळ पोचलेली.  या बरोबर कराड मार्गावरील सती येथे असलेल्या डोंगराला वणवा लागला. हा वणवा चिपळूण अग्निशामक दलाच्या बंबाने येथे जावून वेळीच आग विझविली.

चिपळूण तालुक्यात परशुराम घाट,  वालोपे व दळवटने या गावात वणवा लागल्याची घटना घडली असताना त्यानंतर परशुराम घाटात पुन्हा वणवा लागण्याचा प्रकार घडला. रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा या भागात देखील वणवा लागण्याचे प्रमाण  वाढले आहे. जयगड खंडाळा परिसरात लागलेल्या वणव्यामुळे आंबा बागायदारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.  तसेच लांजा तालुक्यातील भांबेड ओणी या भागात देखील वणवा लागल्याने बागायदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राजापूर तालुक्यातील काही ठिकाणी वणवा लागून काजू आंबा बागायदरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील तापमान ३८ सेल्सिअस अंशाच्या वरती गेल्याने सर्वांनाच प्रखर उष्णतेला सामोरे जावे लागत आहे. या उष्णतेमुळे या वाणव्यांचे प्रमाण वाढले असल्याचे तज्ञ व्यक्तींकडून सांगण्यात येत आहे. तसेच कोकणात येणा-या पर्यटकांच्या चुकीमुळे वाणव्यांचे प्रमाण देखील वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. पर्यटकांमार्फत धूम्रपान करताना सिगारेट किंवा बिडी ओढून झाल्यावर ती न विझवता तशीच टाकली जात असल्याने आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. जंगलातील प्राण्यांची शिकार करण्यासाठी शिकारी जंगलात आग लावून प्राण्यांची शिकार करतात. कोकणातील शेतकरी दरवर्षी शेती मधून जास्त उत्पन्न येण्यासाठी शेत जमिनीत भजावल करतात. शेत जमिनीत लावलेल्या आगीमुळे वणवा लागण्याचे प्रकार वाढतात. कोकणातून जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूचे गवत सुकल्याने आग झपाट्याने वाढत जात आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात आणखीनच उष्णता वाढल्यास वणवा लागण्याचे प्रमाण आणखीनच वाढणार असल्याची  शक्यता निर्माण झाली आहे.  कोकणात आंबा काजू बागायती असलेल्या डोंगराळ भागात पाणी नेणे अवघड काम असल्याने  वणवाने लागलेली आग झटपट विझविणे अवघड होते. आग विझविणारी कोणतीच यंत्रणा त्या ठिकाणी पोहचणे अवघड असल्याने बागायदारांना आर्थिक नुकसानीला  सामोरे जावे लागते..

आकडेवारी काय सांगते?

रायगड जिल्ह्य़ात ३५ हजार हेक्टर खासगी, तर १ लाख ७ हजार हेक्टर सरकारी वनक्षेत्र आहे. यात माथेरानसह फणसाड आणि कर्नाळा अभयारण्य परिसराचाही समावेश आहे. अत्यंत दुर्मीळ वन्य प्रजाती येथे वास्तव्य करतात. हिवाळ्य़ाच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरवातीला जंगलांना वणवे लागण्याचे प्रकार सुरू होतात. यामुळे वनसंपत्तीची मोठी हानी होते. २०१८-१९ मध्ये वणवे लागण्याच्या जिल्ह्यात २०७ घटना घडल्या. यात ८८७ हेक्टर वनक्षेत्र बाधित झाले. २०१९-२० मध्ये वणवे लागण्याच्या तब्बल १७४ घटना घडल्या. यात ५७१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले २०२०-२१ मध्ये डिसेंबर अखेर वणवे लागण्याच्या १३४ घटनांची नोंद झाली. यात ३०६ हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील वनसंपदा बाधित झाली. २०२१-२२ मध्ये ३५५ वणवे लागले, ज्यात ७०३ हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाले. तर २०२२-२३ मध्ये २१९ वणवे लागण्याच्या घटना समोर आल्या, ज्यात ६०२ हेक्टर वनक्षेत्र बाधित झाले.

वणव्याचे दुष्परिणाम कोणते ?

सातत्याने लावल्या जाणाऱ्या या आगींमुळे कोकणातील वनसंपदा अडचणीत आली आहे. वन्यजीवांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. पशुपक्ष्यांचे हकनाक बळी जातात. सुरुवातीला जंगलापुरता मर्यादित असणारा हा प्रश्न आता आसपासच्या परिसरासाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. अनियंत्रित वणवे आता जंगलालगतच्या गावात शिरण्याच्या घटना मागील काही वर्षात समोर आल्या आहेत. वणव्यांमुळे प्रदेशनिष्ठ वनस्पती धोक्यात येत आहे. यात प्रामुख्याने गवताळ कुरणे, दगडफूल, सोनकी प्रकार, कारवी जाती, पानफुटी, कलारगा झाडी, तेरडा, श्वेतांबरी,  रानआले, सोनजाई, गजकर्णिका, रानकेळी, सापकांदा, टोपली कारवी, कुळी कापुरली संजीवनी, सर्पगंधा, अश्वगंधा यांसारख्या वनस्पतींचा समावेश आहे. तर घुबड, चंडोल, रॉबिन रानकोंबडय़ा, मोर, सापांच्या प्रजाती गवतावरील कीटक, उंदीर, भेकरे यांसारख्या पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पुर्वी मुबलक प्रमाणात आढळणारे वन्यजीव आता दिसेनासे होत चालले आहेत. कोकणात १८४ प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातीही वणव्यांमुळे अडचणीत सापडल्या आहेत.

वणवा लागण्याची कारणं 

१. वाढत्या तापमानामुळे झाडांचे होणारे घर्षण.

 २. धूम्रपान करून टाकलेले सिगारेट किंवा बिडीचे तुकडे.

३. वादळ वाऱ्यामुळे होणारे वीज तारांचे घर्षणाने आग लागणे

४. शेतकरी जास्त शेतातून जास्त उत्पन्न येण्यासाठी शेत जमिनीची भाजावल करतात.

५. शिकारिसाठी काही लोक जंगलात आग पेटवून शिकार करतात.

आमच्या सारख्या आंबा बायतदारांवर  वणवा लागल्यास आर्थिक संकट ओढावते. या आंबा उत्पन्नावर आमची आशा असताना दरवर्षी वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागते. या बागायतीचा विमा जरी असला तरी मिळणारी विम्याची रक्कम तुटपुंजी असते. त्याने झालेले नुकसान भरुन निघत नाही.-पंकज साळवी, आंबा बागायतदार, रत्नागिरी.

Story img Loader