‘आष्टीचा सालकरी’ अशी संकल्पना रुढ करणारे राष्ट्रवादीचे मंत्री सुरेश धस यांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात ८ कोटी १६ लाख रुपयांची संपत्ती दाखविली आहे. पाच वषार्ंपूर्वी अवघे दीड कोटी रुपये असलेल्या सालकऱ्याची मालमत्ता पाचपटीने वाढली आहे. धस यांच्या नावावर निवासी घर व एकही वाहन नाही, हे विशेष.
बीड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार धस यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वत:च्या एकत्रित कुटुंबातील  संपत्तीचे विवरण दिले आहे. यात पत्नी प्राजक्ता धस यांच्या नावाने ४ कोटी ३७ लाखांची मालमत्ता आहे. धस यांच्याकडे ८ लाख ८४ हजारांची रोकड, तर बँकेत ३४ हजार रुपये जमा आहेत. वेगवेगळया शेअर्समध्ये ६ लाख ८७ हजार रुपये गुंतवले असून, ४ लाख ३४ हजारांचे विविध व्यक्तींकडून येणे आहे. ४८ हजार रुपये किमतीचे सोने असून पाच लाखांच्या गायी, म्हशी आहेत. त्यांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीची किंमत ५९ लाख ५२ हजार रुपये असून, अशी एकत्रित त्यांच्या नावावर १ कोटी ३१ लाख ७६ हजार ३३३ रुपयांची मालमत्ता आहे.
त्यांच्या वारस संगीता धस यांच्या नावावर ४ लाख ६१ हजारांची रोकड, ५१ लाख १३ हजारांची शेअर्स गुंतवणूक, बँकेत १३ हजारांची रक्कम, ४० लाखांचे येणे, पावणेदोन लाखांचे वाहन, १० लाखांचे सोने, एक लाखाच्या गायी-म्हशी अशी ९९ लाख ६६ हजारांची चल, तर १कोटी ३२ लाख ३५ हजारांची अचल संपत्ती आहे. त्यांच्या दुसऱ्या वारस प्राजक्ता धस यांच्या नावावर ५८ हजारांची रोकड, ८३ हजार बँकेची शिल्लक, १२ लाख ६१ हजारांचे शेअर्स, ७ लाख १६ हजारांची इतर कर्जे येणे, २२ लाख ५० हजारांचे सोने, २८ हजारांची चांदी अशी ४५ लाख ८६ हजारांची चल, तर ३ कोटी ९१ लाख ६७ हजार ८७० रुपयांची अचल संपत्ती आहे.
प्राजक्ता धस यांच्याकडे १ कोटी ४ लाखांचे विविध बँकांचे कर्ज आहे. मुलगी मथली हिच्या नावाने १५ लाखांची अचल संपत्ती, तर मुलगा जयदत्त व सागर यांच्या नावावर कोणतीही मालमत्ता नाही. विशेष म्हणजे स्वत: सुरेश धस यांच्या नावावर निवासी घर अथवा मालकीचे एकही वाहन नाही.
आष्टी मतदारसंघातून २००९मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दिलेल्या शपथपत्रात सुरेश धस यांनी त्यांच्या कुटुंबीयांकडे एकत्रित मालमत्ता दीड कोटींच्या घरात असल्याचे दाखवले होते. मतदारसंघात निवडून आल्यानंतर आपण आमदार नाही, तर पाच वर्षांंसाठी मतदारांचे सालकरी आहोत, असे सांगत धस यांनी ‘सालकरी’ ही संकल्पना राजकारणात रुढ केली. ५ वर्षांत सालकऱ्याची संपत्ती तब्बल ५ पटींनी वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा