सांगली : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या वक्राकार दरवाजातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून चांदोली धरणातून रविवारी सायंकाळपासून ६ हजार ४०० क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा धरण व्यवस्थापनाने दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असून गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ९.७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. मात्र, पश्चिम भागातील चांदोली धरण गेल्या आठवड्यातच काठोकाठ भरले असून धरणात क्षमतेइतके म्हणजे ३४.४० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर शनिवारपासून वाढला असल्याने पाण्याची मोठी आवक होत आहे. यामुळे धरणाच्या वक्राकार धरणातून ५ हजार आणि पायथा विद्युतगृहातून १ हजार ४०० क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. यामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढणार असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा धरण व्यवस्थापनाने दिला आहे.
हेही वाचा – किरण सामंत यांच्या व्हॉट्सअॅपवर ठाकरेंच्या ‘मशाल’ चिन्हाचा डीपी; उदय सामंत म्हणाले…
जिल्ह्यात पावसाची थांबून थांबून सरी येत असून गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ९.७ मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. आज सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस पलूस तालुक्यात १८.२ मिलीमीटर नोंदला गेला.