पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांची अखंड परंपरा आहे. आषाढी, कार्तिकीला सावळ्या विठ्ठलाची भेट घेण्यासाठी पंढरीची वाट पायी चालण्याचे व्रत अनेक पिढय़ांपासून जोपासले जात आहे. वारीला पालखी सोहळ्याचे स्वरूप मिळाल्यापासून हा चैतन्याचा सोहळा फुलू लागला व मोठय़ा दिमाखात पंढरीची वाट चालू लागला. आज पालखी सोहळ्याला एक भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. हजारोंनी चालणाऱ्या वारकऱ्यांची संख्या लाखांवर पोहोचली आहे. हा सोहळा वाढण्याची व व्यापक होण्याची कारणे अनेक आहेत. त्यात निखळ भक्तीचे समाधान, वारीच्या परंपरेचा विस्तार, उत्सुकता व सोहळ्याचे आकर्षण ही काही कारणे आहेत. मात्र, वारीच्या वाटेवर होणारे नियोजन व दिल्या जाणाऱ्या विविध सेवा, सुविधांच्या माध्यमातून पंढरीची कठीण वाट हळूहळू काहीशी सोपी होत गेली, हे एक मुख्य कारण समजले जाते.
सत्तर ते ऐंशी व त्यापुढील वयाची माणसे आजही वारीमध्ये चालताना दिसतात. काही तीस वर्षे, तर काही जण चाळीस वर्षांपासून वारी करीत आहेत. या लोकांचे अनुभव ऐकले, तर दोन- तीन दशकांपूर्वीची वारीची वाट अत्यंत खडतर होती, हे लक्षात येते. पंढरीनाथाची भक्ती करीत वारीच्या वाटेवर जाताना मरण आले, तरी ते भाग्यच असते, असे वारकरी मानतात. ऊन, वारा, पाऊस आदी कशाचीही तमा न बाळगता वारी करणाऱ्या अनेकांनी वारीच्या वाटेवरच प्राण सोडले आहेत. पण, हा काळ आता बदलला आहे. चालत पंढरपुरास जाणे, ही निश्चितच कठीण गोष्ट असली, तरी त्याला सोहळ्याच्या नियोजनाची व विविध मंडळींच्या सेवाभावाची जोड मिळत आहे. त्यामुळे निश्चितच मोठा फरक पडला आहे.
वारीच्या वाटेवर दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवेचा वाटा त्यात सर्वात महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या सामाजिक, धार्मिक संघटना व संस्थांकडून वारीमध्ये वैद्यकीय सेवा पुरविण्यात येते. वारकऱ्यांसाठी विविध आजारांवरील गोळ्या, औषधे मोफत वाटली जातात. वेगवेगळ्या वैद्यकीय पथकांमध्ये डॉक्टर व परिचारिकांचाही समावेश असतो. एखाद्या वारकऱ्याला इंजेक्शन देण्याची किंवा सलाईन लावण्याची गरज असल्यास त्याचीही सोय वारीतील फिरत्या वैद्यकीय पथकाकडून केली जाते. एखाद्या वारकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्यास त्याला रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी वारीत रुग्णवाहिकांचीही व्यवस्था आहे. पालखी सोहळ्याच्या नियोजनाबरोबरच िदडय़ांच्या स्वतंत्र नियोजनामध्येही वारकऱ्यांच्या आरोग्याबाबत काळजी घेतली जाते. निवास व भोजनाची व्यवस्थाही चोख केली जाते. पिण्याच्या पाण्यातून काही विकार होऊ नयेत, यासाठी विशेष काळजी घेतली जाते. अशा पद्धतीने आरोग्याची काळजी व वैद्यकीय मदतीची शाश्वती वाढत गेल्यानेही सोहळ्यात लोकांची भर पडत
आहे.
दुसऱ्या बाजुने पाहिले, तर वारीला जाण्याच्या परंपरेतही दिवसेंदिवस भरच पडते आहे. वारीच्या वाटेवर निखळ भक्तीतून मिळणारे समाधान अनेकांना महत्त्वाचे वाटते. कुणा बुवा, बाबाच्या नव्हे, तर या चैतन्याच्या सन्मार्गावर चालण्याचा मार्ग आता अनेक जण निवडत आहेत. धकाधकीच्या जीवनात या सोहळ्याच्या माध्यमातून सुखाचा अनमोल ठेवा शोधला जातो. वारीबाबतची उत्सुकता अन् दिमाखात चालणाऱ्या या सोहळ्याच्या आकर्षणातूनही अनेक जण सोहळ्याचा भाग होत आहेत. मात्र, ही निखळ भक्ती, परंपरा व उत्सुकता कायम ठेवण्याच्या कामात नानाविध व्यवस्थांचा व सेवांचा मोठा वाटा आहे. म्हणूनच हा भक्तिचैतन्याचा सोहळा फुलण्याबरोबरच दिवसेंदिवस वाढतो आहे.
पावलस मुगुटमल
वाढता वाढता वाढे.. सोहळा हा भक्तिचैतन्याचा..!
पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांची अखंड परंपरा आहे. आषाढी, कार्तिकीला सावळ्या विठ्ठलाची भेट घेण्यासाठी पंढरीची वाट पायी चालण्याचे व्रत अनेक पिढय़ांपासून जोपासले जात आहे. वारीला पालखी सोहळ्याचे स्वरूप मिळाल्यापासून हा चैतन्याचा सोहळा फुलू लागला व मोठय़ा दिमाखात पंढरीची वाट चालू लागला. आज पालखी सोहळ्याला एक भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. हजारोंनी चालणाऱ्या वारकऱ्यांची संख्या लाखांवर पोहोचली आहे.
आणखी वाचा
First published on: 13-07-2013 at 05:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increasing ceremony of devotion