सांगली : शाळकरी मुलांच्यात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात दृष्टिदोष निर्माण होत असल्याचे आरोग्य तपासणीत समोर आले आहे. सांगली जिल्ह्यातील सरकारी शाळांमधील मुलांच्या नुकत्याच करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत ४ हजार ६७० मुलांमध्ये दृष्टिदोष आढळला आहे.
हा वाढता दृष्टिदोष मोबाइल, दूरचित्रवाणी आणि संगणक यांच्या अतिवापरामुळे होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत असून, यामध्ये करोनानंतर या उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे वाढ झाल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, दृष्टिदोष आढळलेल्या सर्व मुलांना अभ्यास करणे सोपे जावे यासाठी आता ठळक अक्षरातील पुस्तके अभ्यासासाठी पुरविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
आणखी वाचा-फलक फाडल्यावरून कोरेगाव मतदार संघात तणाव, दोन्ही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद
समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील सरकारी शाळांमधील मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात येते. या अंतर्गत जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या पहिली ते आठवीच्या वर्गातील ३ लाख ३३ हजार ७३४ मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ४ हजार ६७० मुलांना अल्पदृष्टी हा दोष आढळून आला. दृष्टिदोषामागे पोषक आहाराचा अभाव, जन्मत: दोष, जीवनसत्त्वाची उणीव आदी कारणे असली, तरी संगणक, दूरचित्रवाणी आणि मोबाइलचा अतिरिक्त वापर हेही प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
करोना संसर्गाच्या काळात शालेय कामकाज ठप्प होते. या काळात मुलांना ‘ऑनलाइन’ शिक्षणाची सुविधा बहुतेक शाळांनी उपलब्ध केली होती. या काळातच मुलांच्या आयुष्यात मोबाइलचा वापर वाढला. या वेळी मोबाइल आणि संगणक, दूरचित्रवाणीची संगत लागलेल्या मुलांमध्ये ही उपकरणे वापरण्याचे एक प्रकारे व्यसनच जडले आहे. अनेकदा पालकही लहान मुलांना शांत करण्यासाठी किंवा अडकवून ठेवण्यासाठी मोबाइल देतात किंवा त्याला संगणक, दूरचित्रवाणी सुरू करून देतात. या उपकरणांच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये हा दृष्टिदोष वाढल्याचे दिसून आले आहे.
छोटा पडदा, संगणक आणि मोबाइलवरून परावर्तित होणारे रंगीत प्रकाशकिरण लहान मुलांच्या डोळ्यांना प्रभावित करत असून, याचा परिणाम म्हणून काही मुलांच्यात दृष्टिदोष निर्माण झाल्याचे सर्व शिक्षा अभियानांतर्गत झालेल्या तपासणीत पुढे आले. जिल्ह्यात अल्पदृष्टी असलेल्या मुलांना नियमित आकाराची पुस्तके वाचण्यास कठीण जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना अभ्यास करणे सोपे जावे म्हणून नियमित पुस्तके ठळक अक्षरात तयार करून पुरवण्यात आली आहेत.
आधुनिक युगात ‘डिजिटल’ शिक्षण अपरिहार्य असले, तरी संगणक, भ्रमणध्वनीवर अभ्यास करताना मुलांनी अधूनमधून डोळ्यांना विश्रांती द्यायला हवी. दूरचित्रवाणी पाहताना सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांना पूरक आहार देणे गरजेचे आहे. याचबरोबर मुलांच्या हाती फार काळ भ्रमणध्वनी राहणार नाही याचीही दक्षता घ्यायला हवी. याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शाळांमधील मुलांमधील दृष्टिदोष वाढत आहे. -डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा शल्यचिकित्क, सांगली
© The Indian Express (P) Ltd