हत्ती, गवारेडय़ासह वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊन लोकांचे जीवन धोक्यात आल्याचे केंद्र सरकारला कळवून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा, तसेच केरळी लोकांची बेसुमार वृक्षतोड वनखात्याच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने करत वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानभरपाईत वाढ करा, अशा अनेक मागण्या उपवनसंरक्षक तुकाराम साळुंखे यांच्याकडे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने केल्या.
उपवन संरक्षक तुकाराम साळुंखे यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळ भिसे, राष्ट्रवादी महाप्रवक्ते माजी आमदार पुष्पसेन सावंत, तालुका अध्यक्ष अशोक दळवी, सुरेश गवस, शिवाजी सावंत, भारती देसाई, रमेश गावकर, शिवप्रसाद देसाई, पंढरी राऊळ, रणजित सावंत, पंचायत समिती सदस्या सौ. गावडे, नारायण हिराप, कुडाळ तालुका अध्यक्ष दादा बेळणेकर व पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वन्य प्राणी नुकसान करत असलेल्या शेती-बागायतीच्या नुकसानभरपाईत वाढ करावी, असे वनराज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत सुचविले होते, त्याचे काय झाले, असा प्रश्न जिल्हाध्यक्ष बाळ भिसे यांनी केला. शासन पातळीवर हत्ती बंदोबस्तासाठी लाखो रुपये संपवूनही हत्तींचा बंदोबस्त केला नाही, असे पुष्पसेन सावंत यांनी विचारले. हत्ती फटाक्यांना घाबरत नाहीत. ते दिवसाढवळ्या लोकवस्तीत येतात. अजून कितीजणांचे बळी घेणार आहात, शेती बागायती नष्ट करणाऱ्या हत्तींनी केळी, नारळ, बांबू अशा फळबागायतींनाही लक्ष्य केले आहे. त्यामुळे तुटपुंज्या भरपाईने शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान होत आहे, असे सांगत बाळ भिसे, पुष्पसेन सावंत यांनी उपवनसंरक्षक यांचे लक्ष वेधले.
या वेळी उपवन संरक्षक साळुंखे म्हणाले, भरपाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तो असा- मृतांना दोन लाखांवरून पाच लाख, जखमींना ५० हजारांवरून एक लाख, भाताला प्रतिगुंठा एक हजार, तसेच शेती व बागायती पिकांना भरपाई प्रस्ताव पाठविला आहे. या वेळी बाळ भिसे, सुरेश गवस यांनी नारळाच्या मोठय़ा झाडाला दहा हजार, काजूला सहा हजार मिळावेत. जरूर तर कोकण कृषी विद्यापीठाचे परिपत्रक पाहा, असे सुचविले.
या वेळी आंबोली पंचायत समिती सदस्या सौ. गावडे यांनी आंबोलीत उसाचे गवारेडय़ांनी प्रचंड नुकसान केले आहे, तसेच अस्वलांनी काहींना जखमी केले आहे. त्यांना भरपाई मिळावी, अन्यथा वनजंगलाला संरक्षण कंपाऊंड टाका, असे सुचविले. त्या वेळी नुकसानीचे पंचनामे करून भरपाईसाठी प्रस्तावित केले जातील, असे उपवनसंरक्षकांनी सांगितले.
माकडांनी नारळाचे प्रचंड नुकसान केले असूनही भरपाई नाही, असे बाळकृष्ण बेळणेकर म्हणाले. माकडांची परिपत्रकात नोंद नसल्याने भरपाईची अडचण येत असली तरी प्रस्ताव पाठविला आहे, असे उपवनसंरक्षक म्हणाले.
गेल्या दहा वर्षांत जंगली प्राण्यांनी लोकवस्तीत येऊन प्रचंड नुकसान करून मनुष्यहानी केली आहे. केरळी लोकांनी जंगल तोडून साफ केले आहे. वनखात्याच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही, असे बाळ भिसे म्हणाले. या वेळी साहाय्यक वनसंरक्षक टी. पी. पाटील यांनी नैसर्गिक कंट्रोल राहिला नसल्याचे स्पष्ट केले.
शेती-बागायती कुंपणासाठी सोलर कंपाऊंड अनुदानावर द्यावे, हत्तींसाठी टेहळणी पथक द्या, हत्तीसह वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा, असे सांगत सर्वच वन्य प्राण्यांपासून संरक्षण करताना मानवी वस्तीत प्राण्याचे आगमन धोकादायक असल्याचे केंद्र सरकारला कळवा, असे सुचविले.

Story img Loader