सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांचे हॅटट्रिक करण्याचे स्वप्न अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भंग केले.खासदार पाटील यांचा एक लाखाहून अधिक मतांधिक्यानी पराभव करत विशाल पाटील यांनी विजय संपादन केला. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार पाटील यांनी यापुढे माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या सल्ल्यानेच पुढील भूमिका घेणार असल्याचे जाहीर केले.
सांगली मतदार संघात ७ मे रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी आघाडी घेतली. केवळ सहाव्या फेरीवेळी केवळ १ हजार ५३४ मताधिक्यं घटले, मात्र, पुन्हा प्रत्येक फेरीला विशाल पाटील यांचे मताधिक्य वाढतच गेले. अखेरच्या पोस्टल मतांची मोजणी उरली असताना विशाल पाटील यांना ५ लाख ६९ हजार ६८७ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी भाजपचे संजयकाका पाटील यांना ४ लाख ६८ हजार ५९३ मते मिळाली. यामुळे विशाल पाटील हे १ लाख १ हजार ९४ मतांनी विजयी झाले. पोस्टल मतांची मोजणी झाल्यानंतर अधिकृत मते जाहीर करण्यात येणार आहेत.
हेही वाचा…“सातारच्या निसटत्या पराभवाची मनात सल”; जयंत पाटील म्हणाले, “दहापैकी सात उमेदवार…”
महाविकास आघाडीची उमेदवारी हट्टाने मिळवणार्या उबाठा शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना केवळ ५५ हजार मते मिळाली. सांगली काँग्रेस विचारांचा मतदार संघ असतानाही पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी काँग्रेसला विश्वासात न घेता परस्पर मिरजेत येऊन पैलवान पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने निर्माण झालेल्या राजकीय कोंडीमध्ये विशाल पाटील यांनी बंडखोरी करत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. यामुळे काँग्रेससह राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी राहिल्याने हा विजय झाला.
अपक्ष पाटील यांच्या विजयानंतर सांगली, मिरज, जत शहरासह सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. दुचाकीवरून रॅली काढत आनंदोत्सव साजरा केला. काँग्रेस समितीजवळ असलेल्या वसंतदादा भवन, जिल्हा परिषदेसमोर असलेल्या विष्णुअण्णा भवन, बाजार समिती आदी ठिकाणी मुक्त हस्ते गुलालाची उधळण करत विजयोत्सव कार्यकर्त्यांनी साजरा केला.
हेही वाचा…“ज्या दिवशी ते सगळं घडलं अन् आजचा दिवस…”; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आयुष्यात कधीही…”
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर माध्यमांशी बोलताना विशाल पाटील म्हणाले, हा विजय काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या विचाराचा विजय आहे. आमचे नेते डॉ. आमदार विश्वजित कदम हे काँग्रेस श्रेष्ठींशी बोलून पुढील भूमिका जी सांगतील त्यानुसार आपली वाटचाल राहील.