MLA Sharad Sonawane Demands Ministership From Mahayuti : राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यानंतर भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अशात आता लवकरच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून महायुतीतील सर्वच पक्षांच्या आमदारांनी कंबर कसली आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी महायुतीकडून मंत्रिपद मिळावे म्हणून विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसत, मंत्रिपदाची मागणी करणारे फलक झळकावले आहे. सध्या आमदार शरद सोनावणे यांच्या या अनोख्या मागणीची राज्यभरात चर्चा होत आहे. शरद सोनावणे यांच्या मंत्रिपदाच्या मागणीचा महायुतीचे नेते विचार करणार का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
अपक्ष आमदाराने मागितले मंत्रिपद
पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघातून यंदा अपक्ष लढलेल्या शरद सोनावणे यांनी बाजी मारली आहे. निवडणुकीतील विजयानंतर सोनावणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. अशात आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शरद सोनावणे यांनी, महायुतीकडून मंत्रिपद मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मंत्रिपदाची मागणी करण्यासाठी आमदार शरद सोनावणे आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसले होते. यावेळी त्यांच्या हातात असलेल्या फलकावर लिहिले होते की, “यशवंतरावांनी केली किल्ले शिवनेरीवरुन सुरुवात…शिवजन्मभूमीचा करू सन्मान, महायुती देईल मंत्रिमंडळात स्थान.”
दरम्यान आमदार शरद सोनावणे यांच्या हातात असलेल्या फलकावर छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही फोटो आहेत.
कोण आहेत आमदार शरद सोनावणे?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जुन्नरचे माजी आमदार शरद सोनावणे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. यावेळी महायुतीतून जुन्नरची जागा राष्ट्रवादीला (अजित पवार) गेल्यामुळे सोनावणे यांनी विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवली. यामध्ये त्यांनी विद्यमान आमदार अतुल बेनके आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) सत्यशिल शेरकर यांचा पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आमदार शरद सोनावणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला होता.