छत्रपती संभाजीराजेंच्या अपक्ष राज्यसभा उमेदवारी अर्जावर रायगड जिल्ह्यातील उरण मतदार संघाचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी पहिली सही केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी अपक्ष म्हणून लढणार, अशी घोषणा करताच महाराष्ट्रातून पहिला पाठिंबा उरण मतदार संघाचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी जाहीर केला.
सोमवारी छत्रपती संभाजीराजे यांनी आमदार महेश बालदी यांच्या उरण येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी आमदार बालदी यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून पहिली स्वाक्षरी केली.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विनोद साबळे यांनी आमदार महेश बालदी यांचे आभार व्यक्त केले. तसेच राज्य समन्वयक अंकुश कदम व धनंजय जाधव यांनी महाराष्ट्रातील सर्व अपक्ष आमदारांना छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले.