शेजारील राष्ट्राने राजकीय मैत्री साधण्याचा केलेला प्रयत्न कधी निरपेक्ष नसतो. त्यामुळे कोणत्याही राष्ट्राकडून मित्रत्वाचे असे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला तरी आपण कायम सावधच राहायला हवे, स्वा. सावरकरांनी मांडलेल्या या विचाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे भारताला अनेक बिकट प्रसंगांचा सामना करावा लागला. दहशतवाद, नक्षलवाद थोपविण्याबरोबर देशाच्या एकूणच सुरक्षिततेसाठी भारताची संरक्षण यंत्रणा सुसज्ज करणे आवश्यक आहे, असा सूर रौप्य महोत्सवी स्वा. सावरकर साहित्य संमेलनात शनिवारी आयोजित ‘सावरकर आणि हिंदुस्तानची संरक्षण सिद्धता’ या विषयावरील सत्रात निघाला. दिवसभरात चार सत्रांद्वारे वेगवेगळ्या विषयांवर मंथन झाले.
ऊर्जा युवा प्रतिष्ठान आणि सावरकर साहित्य अभ्यास मंडळ यांच्यातर्फे आयोजित संमेलनात दुसऱ्या दिवशी ‘सावरकर आणि हिंदुस्तानची संरक्षण सिद्धता’ सत्रात कमांडर आगाशे, मेजर जनरल शशिकांत पित्रे, ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी सहभाग घेतला. कोणत्याही राष्ट्राशी भारताचे धोरण ‘जशास तसे’ असायला हवे, असे सावरकर यांनी म्हटले होते. पण, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. चीनशी केलेली मैत्रीही अशीच महागात पडली. मैत्रीचा देखावा करत चीनने धोका देऊन आक्रमण केले.
आता तिबेटमध्ये उगम पावणाऱ्या आणि भारतात वाहत येणाऱ्या नद्यांवर धरणे बांधण्याचा कार्यक्रम चीनने हाती घेतला आहे. ही बाब भारतासाठी धोकादायक ठरणार असल्याचे वक्त्यांनी सांगितले. सध्या फोफावलेला नक्षलवाद व दहशतवाद हा अंतर्गत सुरक्षेचा गहन प्रश्न बनला आहे. बाह्य शक्तींपासून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या संकटांचा मुकाबला करण्यासाठी सावरकरांच्या भूमिकेनुसार देशाची संरक्षण सिद्धता वाढविण्याकडे लक्ष केंद्रीय करण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा या वेळी मांडण्यात आला. दरम्यान, ‘सावरकर आणि गुप्तहेर यंत्रणा’ या विषयावर दादुमियाँ यांनी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी, ‘स्वा. सावरकरांचा जीवनपट’ (एक धगधगते अग्निकुंड) या सत्रात हनुमंत सोनकांबळे व दिलीप करंबेळकर तर ‘साहित्यिक सावरकर’ सत्रात शाम देशपांडे व डॉ. शुभा साठे सहभागी झाले. सायंकाळी ‘सावरकरांच्या वाटेवर चालताना’ या सत्रात चित्रा फडके व चंद्रकला कदम यांनी सहभाग नोंदविला. दरम्यान, संमेलनानिमित्त आयोजित सावरकर यांची दुर्मीळ छायाचित्र तसेच शिवकालीन दुर्मीळ शस्त्रास्त्र प्रदर्शनास विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा