पालकांना आपल्या पाल्याची शालेय प्रगती आता एका ‘क्लिक’वर समजणार आहे. पाल्याला कोणत्या विषयाला कोण शिक्षक आहे, विषयवार अध्यापनाची सद्य:स्थिती काय आहे आदी माहितीही समजणार आहे. शाळा बदलल्यास पालकांना आता दाखल्यांसाठी शाळेत हेलपाटे मारावे लागणार नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या दाखल्याचे ऑनलाइन हस्तांतर होईल. विद्यार्थ्यांचे प्रगतिपुस्तक, शाळा सोडल्याचा दाखला आदी बाबी ऑनलाइन होणार असल्यामुळे हे शक्य होणार आहे.
‘डिजिटल इंडिया’च्या पाश्र्वभूमीवर राज्याचा शिक्षण विभागही आता हायटेक बनत आहे. राज्यातील प्रत्येक मान्यताप्राप्त शाळा त्या शाळेतील कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शाळांमध्ये प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी यांची संपूर्ण माहिती ऑनलाइन भरण्यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या (पुणे) माध्यमातून ‘सरल’ (सिस्टिमॅटिक अॅडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अॅचिव्हमेंट ऑफ लर्निग बाय स्टुडंट्स) ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. दि. ३० सप्टेंबपर्यंत यात शिक्षण संस्था, शाळा, विद्यार्थी यांची आवश्यक ती माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रगतिपुस्तक, दाखले तसेच शालेय कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके यासह विविध माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.
राज्यामध्ये प्राथमिक शाळा तसेच मोठय़ा प्रमाणात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा या खासगी व्यवस्थापनामार्फत चालवल्या जातात, मात्र या शाळांची कोणतीही माहिती एकत्रितरीत्या संकलित स्वरूपात उपलब्ध नसते. आता सर्व तपशिलासह संस्थांविषयी सर्व माहिती संकलित केली जाणार आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माहितीमध्ये कार्यरत शिक्षकांची संख्या त्यांची शैक्षणिक अर्हता, ते शिकवत असलेले विषय त्यांचा कार्यभार आदी माहितीचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या माहितीत सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन पद्धतीअंतर्गत शैक्षणिक प्रगतीविषयक माहिती ऑनलाइन भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रगतिपुस्तक ऑनलाइन तयार होणार आहे. ते पालक ऑनलाइन पाहू शकतील. ऑनलाइन प्रगती पुस्तकामुळे विद्यार्थ्यांचे वेगळे प्रगतिपुस्तक ठेवले जाणार नाही. ऑनलाइन प्रगतिपुस्तक िपट्र काढून स्वाक्षरी करून पालकांना दिले जाईल. नजीकच्या काळात वर्गशिक्षक व मुख्याध्यापक यांची डिजिटल स्वाक्षरी करून पालकांना प्रगतिपुस्तक देण्याचे प्रस्तावित आहे.
विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी बारावीपर्यंत शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला हातात न देता त्याने ज्या नवीन शाळेत किंवा महाविद्यालयात प्रवेश घेतला असेल, अशा शाळांमध्ये ऑनलाइन हस्तांतरित करण्यात येणार आहे.
भविष्यात विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे स्वतंत्र भरून न घेता याच माहितीच्या माध्यमातून भरून घेण्याचा मानस आहे. या प्रणालीद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांचा एक युनिक विद्यार्थी आयडी तयार होणार आहे. हा युनिक आयडी विद्यार्थ्यांच्या सर्व शैक्षणिक बाबींसाठी वापरला जाईल. ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड आहे, त्यांच्या आधार क्रमांकास युनिक आयडी समजले जाणार आहे.
प्रत्येक शाळेसाठी मुख्याध्यापकास स्वतंत्र लॉगइन आयडी देण्यात आला आहे. मुख्याध्यापक वर्ग शिक्षकांकरिता लॉगइन आयडी तयार करून देतील. केंद्रप्रमुखापासून शिक्षण संचालकापर्यंत सर्व अधिकाऱ्यांनाही लॉगइन आयडी देण्यात आले आहेत. माहिती भरण्याबाबत सध्या राज्यात विविध पातळय़ांवर प्रशिक्षणे सुरू आहेत. दि. ३० सप्टेंबपर्यंत ही सर्व माहिती भरावयाची आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा