नियोजनशून्य कारभार, भ्रष्टाचार, असुरक्षित जीवन इत्यादीमुळे केंद्र सरकारने देशाची अब्रू वेशीवर टांगली आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी केंद्रातील संयुक्त लोकशाही आघाडी सरकारवर टीका केली.
चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथे आयोजित गावभेट कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेनेचे स्थानिक आमदार सदानंद चव्हाण हेही याप्रसंगी उपस्थित होते. देशातील सद्य:स्थितीचा आढावा घेताना प्रभू म्हणाले की, परदेशी चलनांच्या तुलनेत रुपयाचे झालेले अवमूल्यन आणि प्रचंड महागाई, हा केंद्र सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचा परिपाक आहे. देशात महिलांचे जीवन सुरक्षित नाही. सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आराखडा तयार केला होता, पण निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. परदेशात देशाची प्रतिमा अतिशय खराब झाली आहे, म्हणून आता हे सरकार जनतेने सत्तेवरून खाली खेचण्याची गरज आहे.
पंतप्रधानपदाचे भाजपाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना देशभर मोठा प्रतिसाद मिळत असून, सर्व जाती-धर्माच्या लोकांचा त्यामध्ये समावेश असल्याचे प्रभू यांनी आवर्जून नमूद केले.
निवडणुकीस इच्छुक नाही
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना प्रभू यांनी, आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले. मात्र मागील निवडणुकीनंतर ते प्रथमच चिपळूणला आले होते. त्याबद्दल छेडले असता, अन्यत्र जात असता सहजच येथे आल्याचे सांगत त्यांनी वेळ मारून नेली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा