भारतातील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर झाले. त्यानुसार क्रिकेटमधील पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानबरोबर विश्वचषक स्पर्धेतील यजमान भारताची लढत अमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानने मुंबईत खेळणे टाळल्याचं समजतं. पण, नरेंद्र मोदी स्टेडियम येथे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होत असलेल्या लढतीवरून मनसेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे बाळासाहेबांना कदापीही पटलं नसतं. तो सामना नरेंद्र मोदी स्टेडियम व्हावा हे, तर पटूच शकत नाही. यावर भाजपा आणि शिवसेनेची भूमिका काय?,” असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
ट्वीट करत संदीप देशपांडे म्हणाले, “भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे अजिबात न पटणार आहे. हे मा. बाळासाहेबांना कदापीही पटलं नसतं. आणि तो सामना नरेंद्र मोदी स्टेडियम व्हावा, हे तर पटूच शकत नाही. यावर भाजपा आणि शिवसेना यांची काय भूमिका आहे. उबाठा यांना विचारत नाही आहे. कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे,” असा टोलाही संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.
हेही वाचा : “२०२४ ला माझी महत्वाकांक्षा हीच आहे ती म्हणजे….” देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कधी?
मंगळवारी ( २७ जून ) विश्वचषक सामन्याचे वेळापत्रक मुंबईत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात जाहीर करण्यात आले. त्यानुसार पाकिस्तान विरुद्ध भारताची लढत अहमदाबादमध्ये होणार असल्याचं स्पष्ट झालं. अहमदाबादऐवजी चेन्नई, बंगळुरू किंवा कोलकातामध्ये आपला सामना खेळविण्याची पाकिस्तान क्रिकेट मंडळाची मागणी फेटाळण्यात आली. नरेंद्र मोदी या स्टेडियमवर १५ ऑक्टोबर रोजी हा सामना खेळवला जाईल.