शेतीपूरक जोडधंदा म्हणून दूधदुभत्याचा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देणाऱ्या येथील ‘करुणाश्रम’चा वैदर्भीय शेतकऱ्यांपेक्षा पश्चिम महाराष्ट्रातीलच शेतकरीच अधिक फोयदा घेत असल्याचे दिसून आले आहे. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच विदर्भातील शेतकऱ्यांना याबाबतचे महत्व केव्हा पटणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठानने रतन टाटा फोऊंडेशनच्या सहकार्याने राज्यात विविध प्रशिक्षण केंद्रे सुरू केलेली आहेत. विदर्भातील एकमेव असे प्रशिक्षण केंद्र पिपरी येथील ‘करुणाश्रम’ या अनाथ पशूंच्या संगोपन संस्थेने सुरू केले. ‘पीपल्स फॉर अॅनिमल्स’ या संस्थेमार्फ त तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रशिक्षण केंद्राचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे. अत्यंत सकस असे दूध देणाऱ्या काटक, पण दुर्मीळ होत चाललेल्या गाईच्या प्रजातींचे संवर्धन करण्याचेही काम या माध्यमातून होत आहे. साहिवाल, सारफोरकर, गौळावू अशा दुर्मीळ प्रजातींच्या वळूंचे वीर्यसंकलन करून गावरान गाईंसोबत संकर केला जातो. परिणामी, दोन लिटर दूध देणारी गाय आठ ते दहा लिटर दूध देऊ लागते. या देशी वंशातील गाईच्या दूधाला पूर्णान्न म्हटले जाते. सात प्रकारची खनिजे, २१ प्रकारचे अॅमिनो अॅसिड, २२ प्रकारची क्षारतत्वे, २४०० प्रकारची घटकद्रव्ये या दुधात असल्याचे पशूवैद्यक सांगतात, गीर गाईच्या दुधात असणारे ‘सेरिब्रोमाईड’ हे तत्व लहान मुलांची स्मरणशक्ती व तर्कशक्ती वृध्दिंगत करते, तसेच रक्तविकारातील दोष दूर करणे व सोडियमचे प्रमाण अधिक असल्याने निद्रानाश विकारावर उपयुक्त आहे. या गाईपासून होणारा नर बहुपयोगी आहे. तिचे मलमूत्र सेंद्रीय खतात अत्यंत उपयुक्त गणले जाते. या गाई कोणत्याही वातावरणात तग धरतात. रोगाला बळी पडत नाहीत.
ही दुर्मीळ प्रजाती शेतीपूरक धंद्यास अत्यंत उपयुक्त ठरत असल्यानेच त्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत व्हावा, याचा प्रयत्न संस्थेतर्फे होतो. मात्र, विदर्भातील वर्धा जिल्हा वगळता त्याचा लाभ अन्य जिल्ह्य़ांनी घेतलेला नाही. धुळे, सांगली, जळगाव, सातारा अशा जिल्ह्य़ांतील तरुण शेतकरीच प्रामुख्याने या प्रशिक्षणात सहभागी होत असल्याचा दाखला संस्थेचे आशिष गोस्वामी यांनी दिला. वैदर्भीय शेतकऱ्यांनी या गाईचे पालन केल्यास त्यांच्या उत्पन्नात हमखास भर पडू शकते. खर्चही फोर नाही. सर्वसाधारण चारा पुरेसा आहे. शेतकऱ्यांनी किमान संकर प्रक्रियेचे प्रशिक्षण घेतल्यास त्यांच्या गावाला लाभ मिळू शकतो, असे गोस्वामी यांनी नमूद केले.
दहा हजारांवर कालवडी
पशूधन मित्र म्हणून सुरू झालेल्या या योजनेद्वारे सध्या वीर्य संकलन, संकर, गर्भतपासणी, गोठा व्यवस्थापन, चारा व्यवस्थापन अशा स्वरूपातील प्राथमिक शिक्षण देण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांत दहा हजारांवर कालवडी जन्मास आल्या आहेत.