‘‘कारगिल युद्धात शहीद झालेले सौरभ कालिया हे एक हुशार व शूर अधिकारी होते. त्यांच्या मृत्यूबाबतचा अहवाल संरक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी न्याय मिळविण्यासाठी लढा देत असलेल्या कालिया यांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत,’’ अशी माहिती लष्करप्रमुख जनरल विक्रम सिंग यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १२३ व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनास प्रमुख पाहुणे म्हणून विक्रम सिंग उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. कारगिल युद्धात शहीद झालेले कॅप्टन सौरभ कालिया यांचा पाकिस्तानने छळ करून मारले. मात्र, कालिया यांचे नाव शहिदांच्या यादीत नाही. त्यामुळे न्याय मिळावा म्हणून कालिया यांच्या आई-वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत सिंग म्हणाले की, कालिया यांच्या बाबतचा अहवाल संरक्षण मंत्रालय व मानवी हक्क आयोगाला पाठविण्यात आला आहे. आपण कालिया यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत.
पश्चिम बंगालच्या सीमेवर सैन्य तैनात केले जात आहे. चीनच्या वाढत्या लष्करी तयारीला हे उत्तर आहे का, असा प्रश्न सिंग यांना विचारला असता ते म्हणाले की, देशाची संरक्षण सिद्धता म्हणून हे केले जात आहे. कोणत्या एका देशाला समोर ठेवून हे सैन्य तैनात केलेले नाही. देशाच्या सीमा बळकट करण्यात येत असून हा संरक्षणाच्या दृष्टीने नियमित प्रकार आहे. सैन्यातील आत्महत्या व सोडून जाण्याच्या प्रमाणाबाबत ते म्हणाले की, सैन्यात भरती झाल्यानंतर सैन्य सोडून देण्याचे प्रमाण अन्य देश व इतर क्षेत्राच्या तुलनेत फारच कमी आहे. त्याचबरोबर आत्महत्येचे प्रमाणही कमी आहे. माणसिक ताणतणाव हे आत्महत्येमागील कारण दिसून आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा