सांगली : वाट चुकून तासगावच्या दुष्काळी पट्ट्यात भरकटलेल्या गव्याने चक्क शेततळ्यात डुबकी मारत उन्हाच्या काहिलीपासून बचावाचा प्रयत्न तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी या गावी केला. तासाभर मनसोक्त पाण्यात डुंबल्यानंतर भरकटलेला गवा मार्गस्थ झाला.
गेले चार दिवस जत तालुक्यातील कुंभारी परिसरात आढळून आलेला गवा कवठेमहांकाळ तालुक्यातून तासगाव तालुक्यात विविध ठिकाणी आढळत होता. मात्र, या कालावधीत त्यांच्याकडून कोणालाही इजा अथवा दुखापत झाली नाही, अथवा कोणी त्याला हुसकावण्याचाही प्रयत्न केला नाही. वन विभाग जत तालुक्यापासून त्याच्या पाळतीवर आहे. मात्र या गव्याने डोंगरसोनी या गावाच्या हद्दीतील विजय झांबरे यांच्या मालकीच्या शेततळ्यात मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेतला. दिवसभराच्या उष्म्यामुळे काहिली झाली असताना तो सुमारे एक तास शेततळ्यातील पाण्यात राहिला होता. या कालावधीत झांबरे यांनी भ्रमणध्वनीवर त्याचे चित्रण केले. हे चित्रण समाज माध्यमावर प्रसारित झाले असून यानंतर तो कोणताही प्रयत्न न करता पाण्याबाहेर येऊन मार्ग पत्करला.
हेही वाचा – “शीतल म्हात्रेंचा ‘तो’ VIDEO प्रकाश सुर्वेंच्या मुलानेच…”, वरुण सरदेसाई यांचं मोठं विधान
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याकडून जत तालुक्यातून जिल्ह्यात शिरलेल्या गव्याने कुंभारीतून (ता.जत) कवठेमहांकाळकडे कूच केले. या दरम्यान अनेकांना त्याचे दर्शनही झाले. मात्र, त्याच्याकडून उपद्रव झालेला नाही. काही द्राक्षबागांतून त्यांने फेरफटका मारला, मात्र नुकसान काहीच केले नाही.