अंदमान-निकोबार बेटांवर रडार बसविण्याच्या भारतीय तटरक्षक दलाच्या आग्रहाला बळी न पडता केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परवानगी नाकारल्याने या बेटांवरील दुर्मीळ ‘नारकोंडम हॉर्नबिल’ पक्षीप्रजाती आता सुखाचा श्वास घेऊ शकणार आहे. तटाची टेहळणी करणाऱ्या रडारची उभारणी आणि नारकोंडम बेटावर वीज पुरवठा करण्यासाठी वीज उपकरणे बसविण्यासाठी ०.६३७ हेक्टर जंगल तोडण्याची परवानगी भारतीय तटरक्षक दलाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे मागितली होती. या मागणीवर विचार करण्यासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या अनेक बैठकांमध्ये विचारविमर्श करण्यात आला होता. मात्र, अशी परवानगी दिल्यास या बेटांवरील नारकोंडम हॉर्नबिल ही दुर्मीळ पक्षीप्रजाती धोक्यात येणार असल्याचा इशारा देऊन राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीने याला तीव्र विरोध दर्शविला होता. देशाच्या सुरक्षेशी निगडित प्रश्न असल्याने केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्यावर प्रचंड दबाव होता. या मुद्दय़ावरून पर्यावरण मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय असा संघर्ष उत्पन्न होण्याची चिन्हे दिसत होती. परंतु, कोणत्याही दबावाला न जुमानता त्यांनी रडार उभारणीला परवानगी नाकारली.
नारकोंडम अभयारण्यातील वृक्षतोड या दुर्मीळ प्रजातीला नामशेष करणारी ठरेल, अशी भीती असल्याने तूर्त रडार उभारणीला परवानगी देऊ नये, असा निर्णय पर्यावरण मंत्र्यांनी घेतला. निव्वळ एखाद्या प्रकल्पामुळे एखादी पक्षीप्रजाती नामशेषाच्या मार्गाने वाटचाल करणार असेल तर पर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकल्पाला परवानगी देण्याच्या आपण विरोधात आहोत, असेही नटराजन यांनी स्पष्ट केले आहे.
या निर्मनुष्य बेटावर सुमारे साडेतीनशे नारकोंडम हॉर्नबिल वास्तव्यास आहेत. जगातील ही एकमेव हॉर्नबिल प्रजाती असल्याने त्याची जपणूक आवश्यक असल्याकडे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनी भारत सरकारचे लक्ष वेधले होते. मंडळाचे एक ज्येष्ठ सदस्य व सातपुडा फाऊंडेशनचे संस्थापक किशोर रिठे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून हॉर्नबिलची दुर्मीळ प्रजाती वाचविण्यासाठी यापेक्षा हाच निर्णय अपेक्षित होता, असे म्हटले आहे. या बेटावर मानव वस्ती नसल्याने हॉर्नबिल येथे सुरक्षित आहेत. जर येथे मनुष्याच्या हालचाली सुरू झाल्या तर ही प्रजाती जगातूनच नष्ट होण्याची भीती राहील, असेही रिठे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
राष्ट्रीय वन्यजीव मंडळावर ४७ सदस्य असून त्यापैकी ३२ सदस्य सरकारी किंवा निवृत्त सरकारी अधिकारी आहेत. अन्य सदस्य गैरसरकारी आणि वन्यजीव क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ आहेत. नारकोंडम हॉर्नबिलची प्रजाती धोक्यात येण्याची शक्यता असल्याने बेटावर रडार उभारणीचा प्रस्ताव वन्यजीव मंडळाकडे आल्यानंतर ४ ऑक्टोबर २०११ रोजी मंडळाच्या तज्ज्ञ समितीने संपूर्ण बेटाचा दौरा करून सर्वेक्षण केले होते.