प्रदीप नणंदकर, लोकसत्ता
लातूर : आपल्या शिक्षण पद्धतीत मुलांच्या मानसिकतेचा विचार करत त्याला शाळेत घातल्यापासूनच अपयश येऊ नये याची काळजी घेतली जाते व एकदा शाळेत घातले की त्याला पुढच्या वर्गात तो सहजपणे जाईल याची दक्षता घेतली जाते. गुणवत्ता नसताना त्याला गुण दिले जातात. त्याला मिळणारे गुण ही त्याची मूळ गुणवत्ता नसते, मात्र मिळालेल्या गुणांमुळे आपण हुशार आहोत असे त्याला वाटायला लागते. पालकांचीही त्याच्याबद्दलची अपेक्षा वाढत जाते आणि हा भ्रमाचा भोपळा कधी ना कधी फुटतो. मात्र तोपर्यंत हातात काही शिल्लक राहत नाही. ही आजच्या शिक्षण पद्धतीची मोठी शोकांतिका आहे.
करोनाच्या काळात घरात बसून, परीक्षा न देता नववीच्या गुणावर दहावीचे गुण दिले गेले त्याच पद्धतीने बारावीचेही गुण दिले गेले. अनेक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण दिले गेले. शाळांचा निकाल बहुतांशी ९० टक्क्यांच्या वरच लागला. असे श्रम न घेता गुण मिळत गेल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नंतर या वर्षी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात अडचणी येऊ नये यासाठी अभ्यासक्रम कमी केला. सुमारे २५ टक्के अभ्यासक्रमात घट केली. विद्यार्थ्यांना लिहिण्याचा सराव कमी झाला आहे म्हणून अर्धा तास परीक्षेच्या काळात वेळ वाढवून दिला. अशा सगळय़ा बाबी करूनही विद्यार्थ्यांच्या मूळ गुणवत्तेत वाढ झाली अशी स्थिती नाही तर ती सूजच राहिली.
शाळांमध्ये हे वातावरण असल्यामुळे तसेच वातावरण आता खासगी शिकवणी वर्गातही ठेवले जात आहे. अकरावी, बारावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन बहुतांश विद्यार्थ्यांचे स्वप्न हे डॉक्टर व इंजिनीयर बनण्याचे असते. डॉक्टर बनण्यासाठी आता अकरावी व बारावी या दोन वर्षांची सामूहिक परीक्षा नीट घेतली जाते आणि त्याची तयारी दोन वर्षे केली जाते. आपल्याकडे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सोपे पेपर देऊन त्यांना चांगले गुण पडतात याचा आनंद दिला जातो. कारण काठिण्यपातळी अधिक असेल व त्यांना गुण कमी पडले तर असे विद्यार्थी कदाचित शाखा बदलू शकतात आणि त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी होऊ शकते. खासगी शिकवणी वर्गात सुरुवातीपासूनच मुलांच्या अपेक्षा वाढवल्या जातात. ७२० पैकी पाचशेपेक्षा अधिक गुण विद्यार्थ्यांला पडतील याचे काळजी घेतली जाते.
सराव परीक्षेत असे गुण दिले जातात, विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड असते. सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासल्या जातातच असे नाही. अशा विद्यार्थ्यांना वर्षभर चांगले गुण मिळत असल्यामुळे पालकांच्या अपेक्षा वाढतात. आपल्या पाल्याची गुणवत्ता सुधारते आहे याचे समाधान त्यांना मिळते. मात्र ते औटघटकेचे ठरते. ऐन परीक्षेच्या वेळी जो पेपर येतो त्याची काठिण्यपातळी वरच्या श्रेणीची असते. त्यातून ५०० पेक्षा अधिक गुण सराव परीक्षेत घेतलेल्या विद्यार्थ्यांला २५० गुण पडतात. मग पालकांना असे वाटते की, आपल्या पाल्यांनी परीक्षेच्या वेळेला ताण घेतला असावा आणि त्यामुळे त्याला कमी गुण मिळाले असावेत.
एक संधी गेली तर हरकत नाही, पुन्हा तू परीक्षेला बस, पुन्हा परीक्षा दे, असे सांगितले जाते आणि तो मुलगा किंवा मुलगी जर पुन्हा परीक्षेला बसणार असतील तर खासगी शिकवणी वर्गाला अधिकचे पैसे मिळतात. राज्यभरात नीटची परीक्षा पुन्हा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही हजारात आहे. यात खासगी शिकवणी वर्गाला यातून पैसे मिळतात, मात्र मुलांचे भवितव्य टांगणीला लागते.
या वर्षी नीटचा निकाल हा ७ सप्टेंबर रोजी लागला आणि या अभ्यासक्रमाची महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया जूनमध्येच पूर्ण झाली. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा ठरवला तरी महाराष्ट्रात कुठल्याही महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन शासनाने ज्या महाविद्यालयात क्षमता आहे अशा महाविद्यालयाला जागा वाढवून दिल्या पाहिजेत आणि अशा विद्यार्थ्यांची सोय केली पाहिजे. दुर्दैवाने या सगळय़ा विषयांमध्ये गांभीर्याने कोणीही विचार करत नाही. ज्या विषयाचे महाविद्यालयाचे वर्ग तुकडय़ा अधिक वाढवून दिल्या पाहिजेत त्याकडे शासनाचे लक्ष असत नाही .वास्तविक आयटी सेक्टरला प्राधान्य मिळत आहे, अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्रवेश घेऊन पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच असे व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. अनेक कंपन्या अशा विद्यार्थ्यांना नोकरी करत करत पुढे शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतात हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. मात्र या विषयाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. राज्य शासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा मोठय़ा प्रमाणावर कल वाढतो आहे. अनेक विद्यार्थी आपल्याला प्रवेश मिळावा यासाठी धडपडत असतात. मात्र जागाच कमी असल्यामुळे आपण संधी देऊ शकत नाही. राज्य शासनाने राज्यभरातच ज्यांच्या क्षमता आहेत अशा महाविद्यालयांना जागा वाढवून दिल्या पाहिजेत.
– डॉ. एम. आर. पाटील, संस्थापक अध्यक्ष, कॉक्सिट महाविद्यालय