नांदेड : भारतीय लोकप्रशासन संस्थेची बैठक विजय सतबीर सिंघ यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 14) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीला संस्थेचे महाराष्ट्राचे मानद अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय आणि दिल्ली येथील मुख्य शाखेचे सदस्य दिलीप लोंढे यांची ऑनलाईन उपस्थिती होती. यावेळी नांदेड शाखेच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची निवड करण्यात आली.
भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या अध्यक्षपदी देशाचे उपाध्यक्ष जयदीप धनखड हे असून महाराष्ट्र राज्य शाखेच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मानद अध्यक्ष म्हणून राज्याचे मुख्य आयुक्त, सार्वजनिक सेवा हक्क स्वाधीन क्षत्रिय असून डाॅ. विजय सतबीर सिंघ हे या शाखचे मानद सचिव आहेत.भाडेमुक्त कार्यालय, फर्निचर, कार्यालयीन उपकरणे, मोफत दूरध्वनी, वीज, इंटरनेट काॅन्फरन्स हाॅल, प्रशिक्षण वर्ग कक्ष आणि इतर उपकंपनी सेवा यासारख्या सर्व पायाभूत सुविधा राज्य सरकार या शाखेला पुरवते. नांदेड शाखा सोमवारी स्थापन झाली असून या शाखेला कौठा येथील महसूल सदनिकेत तात्पुरत्या स्वरुपात कार्यालय देण्यात आले आहे.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात या शाखेची पहिली बैठक पार पडली. लोकप्रशासन विषयाच्या अनुषंगाने प्रशासकीय सुविधा तयार करण्याच्या दृष्टीने अभ्यासकांकडून मार्गदर्शन घेणे, समाजोपयोगी उपाय सुचवणे. यासारखी या संस्थेची कामे असून राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी या शाखेला राज्याची प्रशिक्षण संस्थ म्हणून मान्यता दिली आहे. राज्य सरकार, स्थानिक संस्था आणि संबंधित कार्यालयाच्या कर्माचाऱ्यांसठी माहिती अधिकार कायदा, सार्वजनिक सेवा अधिकार कायदा, महाराष्ट्र राज्य विधान व्यवहारा संबंधीचे नियम, महाराष्ट्र नागरी सेवा नियम, निसर्गोपचार आणि योगाद्वारे ताण व्यवस्थापन अशा विविध विषयावर प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे या शाखेचे उद्दिष्ट आहे.
सोमवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांची अध्यक्षपदी तर प्रा.डाॅ. बालाजी कत्तुरवार यांची सदस्य सचिव म्हणून निवड झाली. प्रा.डाॅ. अमोल काळे यांच्याकडे खजिनदार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. याशिवाय प्रा.डाॅ. दीपक वाघमारे, प्रा.डाॅ. राम जाधव, प्रा.डाॅ. व्यंकट विळेगावे, प्रा.डाॅ. विजय तरोडे यांच्यासह डाॅ. कळमसे, डाॅ. बेग, डाॅ. रवी बर्डे, डाॅ. शंकर लेखणे, प्रा.डाॅ. बाळासाहेब भिंगोले आदींची उपस्थिती होती.