लॉन टेनिस खेळात भारतीय खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे, यामध्ये शंकाच नाही; परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडू शारीरिक क्षमतेत कमी पडतात. जर त्यांनी शारीरिक क्षमता व पोषक आहार या गोष्टींकडे लक्ष पुरविल्यास लॉन टेनिस जगावर भारताचा दर्जा नक्कीच उंचावेल, असे मत डॉ. वेस पेस यांनी महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेमार्फत जिल्हा टेनिस संघटनेच्या वतीने येथे आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
डॉ. पेस हे जगविख्यात लॉन टेनिसपटू लिएंडर पेस यांचे वडील आहेत. १९७२ च्या ऑलिम्पिकपदकविजेत्या भारतीय हॉकी संघाचे ते सदस्य होते. सध्या ते भारतीय हॉकी महासंघासह भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, अखिल भारतीय टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्याबरोबर फिटनेस प्रोग्रॅमर म्हणून कार्यरत आहेत. राज्य संघटनेमार्फत नाशिक विभागातील खेळाडूंसाठी आयोजित शिबिरात ५० निमंत्रित खेळाडू सहभागी आहेत. शिबिरात भारतीय कनिष्ठ संघाचे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे, राज्य संघटनेचे प्रमुख प्रशिक्षक मनोज वैद्य, तंदुरुस्ती प्रशिक्षक जिलानी शेख मार्गदर्शन करणार आहेत.
डॉ. पेस यांचे स्वागत जिल्हा संघटनेचे सचिव सत्यजित पाटील यांनी केले. जिल्हा टेनिस संघटना अध्यक्ष दीपक पटेल यांनी केले. शिबिराची माहिती राज्य संघटनेचे सहसचिव राजीव देशपांडे यांनी दिली. सूत्रसंचालन प्रशिक्षक राकेश पाटील यांनी केले. या प्रसंगी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष दीपक पटेल, जयप्रकाश गोखले, सुरेश धात्रक, धवलचंद्र पटेल, संजय कोठेकर, केतन रणदिवे, किशोर व्यास, जितेंद्र सामंत आदी उपस्थित होते.