एकीकडे पूरपरिस्थितीचा सामना सुरू असतानाच सांगली, कोल्हापूर आणि पुण्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या ठिकाणी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येत्या 48 तासात पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईतबी पावसाच्या तुरळक सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी होऊ शकते. तर नंदूरबार आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळेल. तर पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

गेले चार दिवस सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्य़ांना वेठीस धरलेल्या महापुराने गुरुवारी आणखी हात-पाय पसरत या दोन्ही शहरांबरोबरच जिल्ह्य़ातील मोठ्या भागास आपल्या कवेत घेतले. विविध यंत्रणांनी या दोन्ही जिल्ह्य़ातून दोन लाखांहून अधिक नागरिक आणि 22 हजार जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. एनडीआरएफ, नौदल, लष्कर आणि तटरक्षक दल यांच्या विविध पथकांद्वारे युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.