गाव-खेड्यांपासून ते शहरांपर्यंत प्रत्येकजण देशासाठी जगत आहेत. जगभरात राहणारे माणसे भारतीयत्वाच्या धाग्याने बांधली गेलेली आहेत. देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून महासत्ता झाल्यानंतरही देशातील प्रत्येक घटकाची ओळख भारतात जपली जाईल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
नागपूर येथील रेशीम बागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवनात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यावेळी भागवत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. शांततेतून समृद्धी येणार आहे. त्यासाठी देत राहिले पाहिजे. एकमेकांसाठी जगणाऱ्या माणसांमुळे सद्भावना निर्माण होते. जगात कुठेही गेलो तरी आपण भारतीय आहोत. आपल्या सगळ्याच गोष्टी या भूमीशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत आपण भारतासाठी जगू तोपर्यंत कोणतेही काम भारत करू शकतो. तसेच आपण ज्या समानतेविषयी बोलतो, ती प्रत्यक्षात यायला हवी, असे सांगत भागवत यांनी समान नागरी कायद्याकडेही अप्रत्यक्षरित्या लक्ष वेधले.
दरम्यान, कलम ३७० च्या निर्णयावर माध्यमांशी बोलताना भागवत म्हणाले, देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी बलिदान केले, त्यांचे स्मरण करून पुन्हा संकल्प केला पाहिजे. असाच संकल्प वर्षानुवर्षे केल्यामुळेच ३७० हटवू शकलो आहोत. हा देशाचा संकल्प आहे. यावेळी सरकार योग्य दिशेने काम करीत आहे का, या प्रश्नांवर मात्र त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.