राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणुक होणार असून माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे.अशी घोषणा देशातील पहिल्या तृतीयपंथी सरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली कांबळे यांनी पुण्यात एका कार्यक्रमानंतर लोकसत्ता ऑनलाइनच्या प्रतिनिधीशी बोलताना केली.
गतवर्षी राज्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत माळशिरस येथील तरंगफळ गावच्या सरपंचपदी तृतीयपंथी ज्ञानेश्वर कांबळे यांची निवड झाली. या त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. या वर्षभराच्या कालावधीत राज्यातील अनेक भागात त्यांना सन्मानित करण्यात आले. आज पुण्यात एका कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर कांबळे या आल्या असता त्यांच्याशी संवाद साधला.
त्यावेळी ज्ञानेश्वर कांबळे म्हणाल्या की, माळशिरस तालुक्यातील तरंगफळ हे गाव तीन हजार लोकांचे गाव आहे. या गावातील प्रत्येक व्यक्तीच्या घरी तृतीयपंथी म्हणून कार्यक्रमानिमित्त जात असल्याने त्यांच्या समस्या माहीत होत्या. त्यामुळे गावातील लोकांसाठी काही तरी करावं अशी इच्छा सुरुवातीपासून होती. त्याच दरम्यान गतवर्षी निवडणुका समोर आल्या. या निवडणुकीत सुरुवातीला अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुढे भारतीय जनता पार्टीने त्यांच्याकडून उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार केला. या प्रचाराला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आणि मी प्रचंड बहुमताने निवडून आले. गावची सरपंच होण्याचा मान मिळाला. या पदावर काम करण्याची संधी मिळाल्यापासून गेल्या वर्षभरात गावातील 80 टक्के कामे पूर्ण केली आहेत. रस्ते,लाईट आणि शौचालय बांधणे या सारखी अनेक कामे केली आहे. ही कामे करताना एक समाधान मिळत असून आजवर देवाची सेवा केली. आता राजकारणातून समाजाची सेवा करणार आहे. राजकारणात कायम सक्रिय राहणार असून आगामी विधानसभा निवडणूक माळशिरस मतदार संघातून लढवणार आहे. या निवडणुकीत देखील विजयी होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, तृतीयपंथी म्हणून समाजाची आमच्या सारख्या व्यक्तीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन आहे. हे लक्षात घेता समाजातील प्रत्येक व्यक्तीने आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.