छत्रपती संभाजीनगर : अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी परभणीतील मूक मोर्चा दरम्यान काढलेल्या विधानावरून त्यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी तुकाराम बाबूराव अघाव यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान, परळी पोलीस ठाण्यासमोर ओबीसी समाजाच्या वतीने धनंजय मुंडे यांच्या विरोधात करण्यात येणाऱ्या विधानांवरून दुपारच्या वेळी जोरदार निदर्शने करण्यात आली. मनोज जरांगे, अंजली दमानिया व सुरेश धस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशा घोषणा देण्यात आल्या. अशीच काही आंदोलने बीड जिल्ह्यातील अन्य काही शहरांमध्ये करण्यात आली.