गेले १५ दिवस पीकविमा रकमेवरून सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळानंतर अखेर जिल्हा बँकेने विमा रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्याचे ठरविले आहे. उद्या (शनिवारी) यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात होत असलेल्या शेतकरी मेळाव्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते हे वाटप होणार आहे. पीक नुकसानीपोटी विमा कंपनीने दिलेल्या रकमेवरून नेत्यांमध्ये रंगलेल्या राजकीय फडाबद्दल शेतकऱ्यांत मात्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा बँकेला मागील महिन्यात पीकविमा कंपनीकडून पीक नुकसानीपोटी मंजूर ३३६ कोटी निधी प्राप्त झाला. शेतकऱ्यांनी भरलेल्या पशामुळेच विमा कंपनीने काही पिकांना विमा मंजूर केला. जिल्हा बँकेमार्फत दिलेली रक्कम तत्काळ वाटप होणे आवश्यक होते. मात्र, ६ लाख लाभार्थ्यांच्या याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगत बँक प्रशासनाने ही रक्कम खासगी बँकेत टाकून व्याज मिळवण्याचा, तसेच शेतकऱ्यांकडील थकीत कर्ज कपात करण्याचा प्रयत्न सुरू केला. याच मुद्याला धरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जिल्हा बँक संचालक मंडळावर तोफ डागताना बँकेचे नेतृत्व करणाऱ्या पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या हक्काचे पसे वाटप न करता, बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी, संचालक मंडळाचा ठराव न घेता परस्पर खासगी बँकेत पसे गुंतवून शेतकऱ्यांच्या पशावर व्याज मिळवण्याची सावकारकी करीत आहेत. विमा रकमेतून शेतकऱ्यांचे थकीत कर्ज वसूल करू नये अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देत चौकशीची मागणी केली.
आदित्य सारडा यांनीही धनंजय मुंडे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देत बँक कोणतेही थकीत कर्ज कपात करणार नाही. लाभार्थ्यांच्या याद्यांचे काम सुरू असल्याने खासगी बँकेमध्ये पसा नियमानुसार गुंतवला, असे सांगत पालकमंत्री मुंडे यांच्या उपस्थितीत पीककर्ज वाटप करण्याचे जाहीर केले. भाजप आमदार आर. टी. देशमुख, संगीता ठोंबरे यांनीही पत्रकार बठक घेऊन धनंजय मुंडे यांना आव्हान देत कर्जप्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या धनंजय मुंडे यांना अटक करण्याची मागणी केली.
राष्ट्रवादी व भाजप नेत्यांमध्ये पीकविमा वाटपावरून पत्रकबाजी, तसेच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यात मुख्य मुद्दा मात्र बाजूला पडला. जूनमध्ये निधी आला. दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ वाटप झाले असते, तर खरीप बी-बियाणांसाठी त्यांच्या कामी आले असते. मात्र, प्रत्येक गोष्टीत राजकीय फायद्याचा हिशेब करणाऱ्या वृत्तीने शेतकऱ्यांचा मात्र कायम तोटा होत आहे. साहजिकच आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळाबद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, पालकमंत्री मुंडे यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात विमा रकमेचे वाटप केल्यानंतर जिल्हा बँक सर्व लाभार्थ्यांना किती दिवसात विमा रक्कम वाटप करणार, याची साशंकता कायम आहे. पीक नुकसानीपोटी सरकारने दिलेले अनुदान वाटप करण्यास बँकेने ४-५ महिन्यांचा कालावधी लावल्याचा पूर्वानुभव पाहता पीकविमा वाटप करण्याबाबत काय होते, याकडे लक्ष आहे.

Story img Loader