देशाला मजबूत बनवून संपूर्ण जगात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी इंदिरा गांधी व वसंतदादा पाटील यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेत्यांनी केलेले कार्य म्हणजे देशाच्या उभारणीसाठी मजबूत पाया आहे. या मजबूत पायामुळेच देशाचे स्वातंत्र्य व लोकशाही टिकून आहे. त्यांचे स्मरण नव्या पिढीला सतत प्रेरणा देत राहील, असे गौरवोद्गार माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी काढले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा जन्मशताब्दी वर्ष सोहळा रविवारी सायंकाळी सोलापुरात माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसने वोरोनोको शाळेच्या प्रांगणात सुमारे पाच हजार कार्यकर्ते व नागरिकांच्या साक्षीने झालेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश व सुशीलकुमार शिंदे यांच्यासह शिवराज पाटील-चाकूरकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, कल्लप्पा आवाडे आदी नेत्यांची मांदियाळी जमली होती. वसंतदादा पाटील यांचे नातू माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील व सून शैलजा प्रकाश पाटील तसेच मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनीही आवर्जून उपस्थिती लावली होती.

या कार्यक्रमात आपण राजकीय भाषण करायला नव्हे तर इंदिरा गांधी व वसंतदादा पाटील या दोन्ही नेत्यांबरोबर आपणांस प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांच्या स्मृतींना अभिवादन  करण्यासाठी आपण आल्याचे स्पष्ट नमूद करीत प्रतिभा पाटील यांनी इंदिरा गांधी व वसंतदादा पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंदिरा गांधी व वसंतदादांनी ध्येयाने प्रेरित होऊन देश व समाज मजबूत केला. गोरगरिबांना आधार दिला. इंदिरा गांधींनी देश सुरक्षित ठेवला नसता, तर देशात दडपशाही वाढली असती आणि त्यातून लोकशाही व स्वातंत्र्य धोक्यात आले असते. इंदिराजींनी केवळ इतिहासच घडविला नाही तर बांगला देशाची निर्मिती करून जगाचा भूगोलही बदलला. असे कर्तृत्व घडविणाऱ्या जगातील त्या एकमेव महिला होत, अशा शब्दात प्रतिभा पाटील यांनी गुणगौरव केला.

धो-धो पाऊस पडत असतानाही चाललेल्या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह तथा जोश संचारल्याचे पाहावयास मिळाले. पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी, आसाराम बापूंना आपल्या पुत्रासह बलात्कार प्रकरणात कारागृहात खितपत पडावे लागत असून त्यानंतर रामपाल हे तुरुंगात गेल्यानंतर आता राम रहीम बाबालाही बलात्काराच्या खटल्यात तुरुंगवास भोगावा लागत आहे. राम रहीमनंतर आता योगगुरू रामदेवबाबांनाही तुरुंगात जाण्याची पाळी येणार असल्याचे भाकीतही त्यांनी केले. या अगोदर सर्वप्रथम आसाराम बापूंना तुरुंगात जावे लागले, त्या वेळी हेच भाजपवाले सोनिया गाांधींमुळे संतमंडळींना तुरुंगात पाठविले जात असल्याचा आरोप केला होता. यात भाजप खोटा तर पडला आहेच, परंतु राम रहीम बाबाला भाजप शरण गेल्याचे पुरते स्पष्ट झाले आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादल्याचा आरोप करणारे पंतप्रधान नरेद्र मोदी हे आता दररोजच अघोषित आणीबाणी लादत  असल्याचा आरोप मोहन प्रकाश यांनी केला. मुंबईत भाजपचे अध्यक्ष अमित शहा लालबागच्या गणपतीच्या दर्शनासाठी आल्याचा उल्लेख करताना लालबागचा राजा गणपपती मंडळाने सावध राहण्याचा सल्ला मोहन प्रकाश यांनी दिला. अमित शहांची नजर लालबागच्या राजाच्या अंगावरील सोने, हिरे, जडजवाहरांवर पडेल आणि त्यातून ईडीची धाडही पडेल, अशी उपरोधिक मल्लिनाथीही मोहन प्रकाश यांनी केली. या वेळी शिवराज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर, डॉ. डी. वाय. पाटील, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवधर्धन पाटील आदींची भाषणे केली. माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी सूत्रसंचालन केले.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indira gandhi vasantdada patil make country foundation strong says pratibha patil