नांदेड : सहा वर्षांपूर्वी रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी करून आणि त्यानंतर चुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू करून रोजगार निर्माण करणारे लहान उद्योग, शेतकरी यांनाच उद्ध्वस्त केले, अशा शब्दांत काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्ला चढविला. नोटबंदी ही काळय़ा पैशांविरोधातील लढाई आहे, असे मोदींनी सांगितले होते, परंतु ते खोटे होते, तो काळय़ा पैशांवरचा हल्ला नव्हता तर या देशातील कोटय़वधी हातांना काम देणारे लहान व्यापारी, व्यवसाय आणि उद्योगांवर आघात होता, असे राहुल म्हणाले.
‘भारत जोडो’ यात्रेचा आजचा महाराष्ट्रातील चौथा दिवस होता. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी नांदेडमध्ये जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी राहुल यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर टीका केला. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसाला, शेतकऱ्यांना, मजुरांना, लहान व्यापारी, उद्योगांना ते परिणाम भोगावे लागत आहेत, त्यावर राहुल यांनी शाब्दिक आसूड ओढले. स्वंतत्र भारतात २८ टक्के इतका कर कधीही लावला गेला नव्हता. जीएसटीच्या माध्यमातून मोदी सरकारने हा कर लादल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांवर कधीही कराचे ओझे लादले गेले नव्हते, परंतु मोदींनी खतावर, शेतीच्या अवजारांवरही जीएसटी लावल्याचे राहुल म्हणाले.
मोदी देशातील सर्व धन फक्त दोन-तीन उद्योगपतींच्या घशात घालत आहेत, असा आरोप राहुल यांनी केला. नोटबंदी आणि जीएसटीमुळे जो उद्योग किमान ३० लोकांना रोजगार देत होता, तेथे आज कशाबशा ५० लोकांना नोकऱ्या मिळत आहेत. म्हणजे २५० जणांचा रोजगार मोदींना हिरावून घेतला, त्यांना बेरोजगार केले. ‘‘नोटबंदी करून काळा पैसा संपवला नाही तर मला चौकात फाशी द्या, असे मोदी म्हणाले होते. पण गेल्या सहा वर्षांत काळा पैसा संपला का असा,’’ सवाल राहुल यांनी केला.
पाहा व्हिडीओ –
सुशिक्षत युवक-युवतींना रोजगार मिळू द्यायचा नाही, मग त्यांच्यात भय निर्माण होते. त्या भयातून द्वेषाचे वातावरण तयार करायचे ही भाजप आणि आरएसएसचे धोरण आहे, त्याविरोधातच भारत जोडो यात्रा निघाली आहे, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेस,आरएसएसमधील फरक..
राहुल यांनी भाषणात केदारनाथच्या दर्शनाचा किस्सा ऐकवला. हेलिकॉप्टरची व्यवस्था होत असताना मी केदारनाथ मंदिरापर्यंत चालत गेलो, तर आरएसएसचा एक कार्यकर्ता हेलिकॉप्टरने तेथे आला होता. त्याचे वजन शंभर किलो होते. त्याच्याबरोबर आलेल्या नोकराच्या डोक्यावर फळाची परडी होती. त्यांना विचारले की हे काय आहे तर ते म्हणाले केदारनाथांना वाहण्यासाठी मी फळे आणली आहेत. खरे तर त्या फळांचे ओझे नोकर वाहत होता. केदारनाथाला त्यांनी त्यांची तब्येत चांगली राहावी अशी प्रार्थना केली. खरे तर १०० किलो वजानाचा तो माणूस चालत आला असता, तर त्याची तब्येत चांगली राहिली असती. मी मात्र मला रस्ता दाखवला त्यासाठी केदारनाथांचे आभार मानले. हा आहे, काँग्रेस आणि आरएसएसमधील आणि गांधी व सावरकर यांच्यातील फरक, असे सांगताच उपस्थितांमधून टाळय़ांचा कडकडाट करण्यात आला.
या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील, आदींची भाषणे झाली. खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री जितेंद्र आव्हडही व्यासपीठावर उपस्थित होते. जयंत पाटील यांनी भारत जोडो यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला.
खरगे यांची मराठीतून टीका
मल्लिकार्जुन खरगे यांनी मराठीतून भाषण केले. आधी पोटोबा मग विठोबा, पण मोदी तुमच्या पोटावर मारत आहेत. मोदींना रोज उठून आम्हाला शिव्या घातल्याशिवाय चैन पडत नाही. तुम्हाला शिव्या देणारे हवेत की सेवा करणारे अशा अस्खलित मराठीत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
इंदिरा गांधींनी आम्हा भटक्यांना नाव, गाव दिलं..
काकांडी ( नांदेड) : ‘आम्ही भटकी जमात, आज इथं तर उद्या तिथं..! इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी आम्हाला घरे दिली, पाच-पाच एकर जमिनी दिल्या. आता त्यांचा नातू येणार हाय म्हणून त्याला आशीर्वाद द्यायला आम्ही रस्त्यावर उभा हाय..!’ सुमारे पासष्ट वर्षे वयाच्या सुशीला बाप्पा मांडवकर भावनिक होऊन सांगत होत्या. इंदिरा गांधी यांच्या तिसऱ्या पिढीशीसुद्धा त्यांचे ऋणानुबंध आणि त्यांना समाजात ओळख निर्माण करून दिल्याची जाणीव त्यांच्या भावनांमधून व्यक्त होत होती. सकाळी ८ च्या सुमारास काकांडी गावाजवळ समाजातील १५ महिला मुलांसह रस्त्याच्या कडेला पदयात्रेची वाट पाहत दोन तास उभ्या होत्या. त्यांच्या मागे पडसर मैदानात त्यांच्या राहुटय़ा दिसत होत्या.
‘तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यां आहात काय?’ या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘आम्ही काँग्रेस कार्यकर्ते नाही. आम्ही हिंदू धर्माची माणसं, नाथपंथी हाय. त्यांच्या आजीने आम्हाला सहकार्य केले. आता राहुल गांधीला आम्ही सहकार्य देणार. त्याला निवडून देणार. त्यांच्या विरोधातल्या लोकांनी देशाला लई कठीण काळ आणलाय.. पण राहुल गांधी जनतेसाठी भेटायला दारात आलाय. जनतेसाठी पैदल वारी करू लागलाय. म्हणून जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहिलेच पाहिजे.’
राहुल यांना भेटून काय सांगणार? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की आमचा समाज भिक्षेकरी. इंदिराजींनी जमिनी दिल्या. म्हणून आम्हाला गाव, नाव, ओळख मिळाली. पण आता दुष्काळ पडलाय, हाताला काम नाही. पोराबाळांची पोटं भरायला भटकत इथं आलो. भिक्षा मागून जगणं. मागे एकदा बेलपाडा येथे भिक्षा मागायला आमची लोक गेली आणि त्यांना चोर समजून लोकांनी मारून टाकलं. दादा, आम्हाला घरे पाहिजेत, मुलाबाळांना शाळा पाहिजे, हाताला कामे पाहिजेत, काहीही करून ही भिक्षा आता सुटली पाहिजे..एवढंच आमचे म्हणणे हाय.
‘सहकार क्षेत्रावरील कर काँग्रेस रद्द करेल’
नांदेड : केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार क्षेत्रावर लावलेले कर रद्द करू, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विविध सहकारी संस्थांच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश यांनी गुरुवारी दिली. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेले सहकार क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा घाट घातल्याचा आरोप रमेश यांनी केला. देशाचे गृहमंत्री अमित शहा आहेत, याकडे लक्ष वेधत सहकार क्षेत्रावर ताबा मिळविण्याचा त्यांचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. भारत जोडो पदयात्रेच्या दरम्यान सहकारी साखर कारखाने, बँका, दूधसंघ, सूतगिरण्या आदी संस्थांच्या शिष्टमंडळाने राहुल यांची भेट घेतली. मोदी सरकारने कर लावल्यामुळे सहकार क्षेत्र अडचणीत आल्याचे त्यांनी गांधी यांच्या निदर्शनास आणले.