दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आणखी पाच वष्रे जादा आयुष्य लाभले असते, तर त्यांच्या खंबीर नेतृत्वामुळे काश्मीरचा जटिल प्रश्न सुटला असता, असे मत काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी व्यक्त केले.
दिवंगत माजी जिल्हा सरकारी वकील शंकरराव तथा अप्पासाहेब ठोकळ यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणा-या विधिज्ञ पुरस्काराचे वितरण निलंगेकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक झाले, त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ वकील भगवान वैद्य यांच्यासह अॅड. करिमुन्निसा बागवान आणि पंढरपूरचे अॅड. माणिकराव गाजरे यांना ठोकळ स्मृती विधिज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्माचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदाचे हे विसावे वर्ष होते. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये या समारंभाला महापौर प्रा. सुशीला आबुटे, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष शिवशंकर घोडके, ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळ्ये आदी उपस्थित होते. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजिलेल्या या समारंभाचे प्रास्तविक माजी आमदार निर्मला ठोकळ यांनी केले.
न्यायदानाची पध्दत बदलण्याची गरज असल्याचे नमूद करताना निलंगेकर यांनी, देशात ब्रिटिशकालीन कायदे आजही अस्तित्वात असून न्यायालयात शपथेवर खोटे सांगितले जात असल्यामुळे गोरगरीब व निष्पाप व्यक्ती दोषी ठरून शिक्षा भोगतात. तर गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना कायद्याचा धाक वाटेनासा  झाला आहे. आठ-आठ, दहा-दहा वष्रे न्यायाची प्रतीक्षा करावी लागते. ही परिस्थिती बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी ‘भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळ्ये यांचे व्याख्यान झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची ताकद वाढत असून आणखी ठोस प्रयत्न केल्यास भारत महासत्ता बनण्यास वेळ लागणार नाही. मात्र त्यासाठी देशातील लोकशाही व्यवस्था तथा धर्मनिरपेक्षता, सामाजिक समता ही मूल्ये अबाधित राहणे आवश्यक आहे. धर्मनिरपेक्षतेला कोणी अडचण आणून कमकुवत करीत असेल तर त्याचे वाईट परिणाम होतील. देशातील वाढता जातीयवाद आणि सामाजिक ध्रुवीकरण देशाला महासत्ता बनण्यास अडसर ठरू शकेल,’ असा इशारा टोळ्ये यांनी दिला.
या प्रसंगी फौजदारी वकिलीच्या ४० वष्रे सेवा बजावल्याबद्दल ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने तसेच माजी जिल्हा सरकारी वकील विजय मराठे यांचा निलंगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुरस्कार मानकरी अॅड. वैद्य, बागवान व गाजरे यांनी मनोगत व्यक्त केले. अॅड. सुरेश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. व्यासपीठावर डॉ. नसीमा पठाण, अॅड. बिपीन ठोकळ, सचिन ठोकळ आदी उपस्थित होते.

Story img Loader