Indrajit Sawant : छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटल्याचा इतिहास हा काँग्रेसने आपल्याला शिकवला वास्तविक महाराजांनी सूरत लुटलं नव्हतं असं वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केलं. ज्यामुळे त्यांना प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. देवेंद्र फडणवीस यांच्यावर इतिहास बदलण्याचाही आरोप होतो आहे. आता या प्रकरणी इतिहासकार इंद्रजित सावंत ( Indrajit Sawant ) यांनी देवेंद्र फडणवीसांना खडे बोल सुनावले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण जरुर करावं पण इतिहास बदलू नये असं सावंत ( Indrajit Sawant ) यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरचा पुतळा आठ महिन्यांत कोसळला. ज्यानंतर महाविकास आघाडीने या घटनेचा निषेध करत जोडे मारो आंदोलन मुंबईत केलं. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, ““मध्य प्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझरने हटवला. याची माफी काँग्रेस मागणार का? कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा तोडण्यात आला. त्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच काँग्रेसने शिकवलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलीच नाही. उलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने शिकवण दिली की छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली. याची माफी काँग्रेस मागणार का?” या वाक्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना ट्रोलही केलं जाऊ लागलं. आता इतिहासकार इंद्रजित सावंत ( Indrajit Sawant ) यांनी एक व्हिडीओ पोस्ट करुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
हे पण वाचा- उद्धव ठाकरेंनी शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या फोटोला मारले जोडे, महाराष्ट्र हे चित्र कधीच विसरणार नाही!
काय म्हणाले आहेत इंद्रजित सावंत?
“छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत ज्याला बंदर ए मुबारक म्हणायचे, मुघल साम्राज्याच्या गालावरचा तीळ असं ज्याला म्हटलं जायचं असं सूरत दोन वेळा लुटलं आहे. १६६४ आणि १६७० या दोन वेळा शिवाजी महाराजांनी सूरतेवर छापा टाकला होता. वीरजी होरा हा तिथला व्यापारी, हाजी बेग, हाजी सय्यद या व्यापाऱ्यांना लुटलं. त्यांच्याकडून प्रचंड मोठी संपत्ती आणली होती. पहिल्या लुटीच्या वेळी सूरतेचा जो सुभेदार होता इनायत खान त्याने शिवाजी महाराजांकडे दूत पाठवला पण तो मारेकरी होता. त्यावेळी छत्रपतींच्या मावळ्यांनी सूरतला आग लावून सूरत बेचिराख करुन टाकलं होतं. हा इतिहास आहे.”
राजकारण करा पण इतिहास बिघडवून नको
पुढे सावंत म्हणाले, “मुघलांची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि स्वराज्याची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी सूरत लूट करण्यात आली. आता ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस खोटा इतिहास सांगत आहेत. ही त्यांची राजकीय रणनीती असावी. कारण शिवाजी महाराजांची वाघनखं नव्हती ती आहेत म्हणून सांगितलं. अशा अनेक गोष्टी ते लोकांच्या माथ्यावर मारत आहेत. राजकारण करायचं असेल तर करा पण इतिहास बिघडवून नको.” असंही इंद्रजित सावंत म्हणाले आहेत. आता देवेंद्र फडणवीस यावर काही बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.