प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कीर्तनात केलेल्या एका वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. स्वतः इंदुरीकर महाराज यांनी खुलासा करत दिलगिरी व्यक्त केली होती. दुसरीकडं आरोग्य विभागानं बजावलेल्या नोटिशीला उत्तर देताना इंदुरीकर महाराजांनी असं काही वक्तव्य केलंच नसल्याचं सांगत यू टर्न घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज यांनी ओझर येथे केलेल्या किर्तनात वादग्रस्त विधान केलं होतं. त्या वक्तव्यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तशी तक्रार अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सकांडे करण्यात आली होती. तक्रारीनंतर आरोग्य विभागानं इंदुरीकर महाराजांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

आरोग्य विभागानं पाठवलेल्या नोटिशीला इंदुरीकर महाराजांनी शेवटच्या दिवशी वकिलांमार्फत उत्तर दिलं. “मी ते वाक्य बोललोच नाही. मी असं कीर्तन केलंच नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी अहमदनगर जिल्ह्यात कीर्तनच केलं नाही. मी समाज प्रबोधन करत असल्यानं मला महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी पुरस्कार मिळाला आहे. तसेच इतर ठिकाणाहून देखील पुरस्कार मिळाले आहेत. युट्युबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंग देखील करत नाही,” असा खुलासा इंदुरीकर महाराजांनी केला आहे.

इंदुरीकर महाराज नेमकं काय म्हणाले होते?

इंदुरीकर महाराजांनी ओझर येथे झालेल्या आपल्या कीर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शरीर संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत इंदुरीकर म्हणाले, “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते.” हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या समर्थनार्थही अनेकजण समोर आले होते. त्यानंतर इंदुरीकर महाराजांनी पत्रक काढून दिलगिरी व्यक्त केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indurikar maharaj clarification on that statement bmh