राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र डागलं आहे. “शिंदे सरकारचं आणखी एक अपयश” अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. या टीकेनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ट्वीट केलं आहे. ‘उद्योग परराज्यात गेले, हे महाविकासआघाडीचे पाप आहे. ते आमच्या माथी मारू नका, जनता सुज्ञ आहे. वो सब जानती है’ असे म्हणत सामंत यांनी महाविकासआघाडीलाच यासाठी जबाबदार धरले आहे.
‘मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री गलिच्छ राजकारणात मग्न आहे, असा शोध आज कुणीतरी लावला. नक्की गलिच्छ राजकारण कोण करत आहे हे महाराष्ट्रातील जनतेला खासदार गजानन किर्तीकरांनी सांगितले आहे’, असेही सामंत यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळेंनी ‘लोकमत’ आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्ताचा हवाला देत, ऊर्जा निर्मिती प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची टीका केली आहे.
“राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे ‘वेदान्त फॉक्सकॉन’, ‘बल्क ड्रग्ज पार्क’ आणि ‘टाटा एअरबस’ हे तीन मोठे प्रकल्प या सरकारच्या डोळ्यांदेखत गुजरातला गेले आहेत. यानंतर आता ‘ऊर्जा उपकरण निर्मिती झोन’ प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर…”, असे ट्वीट सुळे यांनी केले आहे. त्यांच्या या ट्वीटला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
“सगळे बोके एकत्र आले, तरी मी…”, एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांना खुलं आव्हान!
“एवढा मोठा प्रकल्प दोन ते तीन महिन्यात इकडून तिकडे जाऊ शकतो का? ही काय जादूची कांडी आहे का? बोलण्याला पण काही अर्थ असला पाहिजे”, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर प्रत्येकवेळी प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर कांगावा करणं चुकीचं आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.