सांगली : सांगली जिल्हा नेतृत्वाची खाण असतानाही अद्याप विमानतळाची प्रतीक्षा मागणी करावी लागते हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे, असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी सांगलीत बोलताना व्यक्त केले. सांगलीतील अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सौहार्द या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मंत्री सामंत यांच्या हस्ते ‘जर्नालिस्ट असोसिएशन’च्यावतीने ‘लोकसत्ता’चे जिल्हा प्रतिनिधी दिगंबर शिंदे यांच्यासह शेखर जोशी, दत्ता कुलकर्णी, वैद्यकीय सेवेबद्दल डॉ. विनोद परमशेट्टी, उद्योजक रोहन यादव, स्वप्नील शहा, प्रवीण शेट्टी यांचा सन्मानचिन्ह, शाल देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी आ. इद्रिस नायकवडी, जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे, इंद्रजित घाटे, महंमद मणेर, डॉ. चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे यांनी स्वागत केले, तर अध्यक्ष संजय भोकरे यांनी प्रास्ताविक केले.
सामंत म्हणाले, की जिल्ह्यातून विमानतळाची आग्रही मागणी होत आहे. विकासासाठी त्याची गरज आहेच, मात्र, यासाठी आवश्यक बाबी आहेत का, याचीही पडताळणी करायला हवी. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी विमानतळ उभारण्यात आले. मात्र, याठिकाणी आठवड्यातून दोन ते तीन वेळा विमान उतरते. याचाही विचार करायला हवा. सांगली जिल्हा हा नेतृत्वाची खाण आहे. या जिल्ह्याचे नेतृत्वगुण पाहत आम्ही मोठे झालो. तरीही अजून विमानतळाची मागणी करावी लागते हे जिल्ह्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. या जिल्ह्याने मराठी भाषेला ‘करेक्ट कार्यक्रम’ हा शब्द दिला. मी आहे त्या पदावर समाधानी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. आजच्या पिढीच्या हाती असलेले मोबाइल हे फार मोठे शस्त्र तर आहेच, पण याचा वापर किती जबाबदारीने केला जातो यावर या पिढीचे भवितव्य अवलंबून आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापरही उपयोजित झाला पाहिजे तरच त्याचा फायदा समाजाला होणार आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कवी कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी भाषा गौरव दिनापासून मराठी अध्यासन सुरू करण्यात आले असल्याचेही मंत्री सामंत म्हणाले.