रत्नागिरी –जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योजकांमार्फत रत्नागिरी जिल्ह्यात १ हजार ३७ कोटींची गुंतवणूक होणार आहे. रत्नागिरी उद्योजकांसाठी उद्योग हब बनत चालली आहे. पर्यावरणपूरक उद्योग प्रकल्प तसेच पर्यटन प्रकल्पासाठी महिलांनी आता पुढे आले पाहिजे, असे आवाहन उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

येथील स्वयंवर मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन उद्योगमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य अजगेकर, राहूल पंडित, महेश म्हाप, सुदेश मयेकर, कांचन नागवेकर आदी उपस्थित होते.

उद्योगमंत्री डॉ. सामंत म्हणाले, स्थानिक उद्योजकांच्या माध्यमातून १ हजार ३७ कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. यात प्रामुख्याने लोटे परशुराम येथे सुप्रिया केमिकल्स ५५० कोटी गुंतवणूक करणार आहे. एमएसएमईच्या माध्यमातून ५०० कोटी गुंतवणुकीचा समावेश आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात ११५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करत जिल्हा प्रथम क्रमांकावर राहिला आहे.

अनुदान देण्याचे प्रमाण ९८ टक्के आहे. मागच्या वर्षी १ हजार कोटींचे विस्तारिकरण झाले त्यातील ७०० कोटींची अंमलबजावणी झाली असून, ३०० कोटींची वर्षभरात अंमलबजावणी पूर्ण होणार आहे.

सीएमईजीपी योजनेत ११७ टक्के विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने कर्ज मंजूर करुन सर्वात चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँकेनेही चांगली कामगिरी केली आहे, असे ही उद्योगमंत्री डॉ. सामंत म्हणाले.

आणखी १० ट्युरिस्ट गाड्या

महिला बचत गटांनी ट्युरिझमसाठी पुढे यावे, स्वयंपूर्ण व्हावे या भावनेतून त्यांना ४ टुरिस्ट वाहने दिली आहेत. आणखी १० वाहने अजून देणार असल्याचे सांगून उद्योगमंत्री डॉ. सामंत म्हणाले, हाऊस बोट प्रकल्पामध्येही महिलांनी सहभागी व्हावे. स्थानिक रोजगार निर्मितीसाठी चांगल्या पर्यावरणपूरक उद्योग प्रकल्पांसाठी महिलांनी पुढे यावे , असे सांगितले.

कार्यक्रमात सीएमईजीपी, पीएमईजीपीच्या लाभार्थ्यांना कर्ज वितरण पत्र देण्यात आली. त्याचबरोबर सीएमईजीपी मध्ये १०० टक्के उद्दिष्ट प्राप्त करणाऱ्या बँकांचाही यावेळी स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

महिला बचत गट उमेदअंतर्गत फूड ॲण्ड फ्रूट प्रोसेसिंग क्लस्टर चिपळूण, फिश प्रोसेसिंग क्लस्टर दापोली, गारमेंट क्लस्टर चिपळूण या तीन औद्योगिक समुहाकरिता १५ लाखांचा निधी वितरीत करण्यात आला.

या तीन औद्योगिक समुहांसोबत १० कोटींचे एमओयू करण्यात आले. या परिषदेला बँकर्स, गुंतवणूकदार, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.